मुंबई : कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयामध्ये खाटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यावर प्रभावी अंमल होण्यासाठी सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या तपासणीदरम्यान गरज नसलेल्या एखाद्या रुग्णाला खाट दिली असल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचे रुग्णालयातील अॅडमिशन रद्द करण्यात येणार आहे.कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेले रुग्णही परस्पर खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लक्षणे व उपचारांची आवश्यकता असलेल्या गरजू रुग्णांना रुग्णालयात खाट मिळण्यात अडचण निर्माण होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी महापालिकेने कोरोना केअर सेंटर स्थापन केले आहेत. त्यामुळे यापुढे गरजू रुग्णालाच रुग्णालयात दाखल केले जाईल, याची खबरदारी पालिका घेणार आहे. रुग्णांची संख्या अधिक असणाऱ्या मालाड (पूर्व) प्रतिबंधित क्षेत्राचा आयुक्तांनी पायी पाहणी दौरा नुकताच केला. या दौºयादरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला व या भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवासुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील खाटांचे व्यवस्थापन योग्य होण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यानुसार लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात प्राधान्य मिळेल, असे स्पष्ट केले.>खासगी रुग्णालयांवर वॉचमुंबईतील २४ विभाग कार्यालयातील सहायक आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करून कोणत्या रुग्णाला दाखल केले आहे, याची माहिती घेणार आहेत. यामध्ये कोरोनाबाधित, परंतु लक्षणे नसलेला रुग्ण आढळल्यास त्याचे अॅडमिशन तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.जेणेकरून लक्षणे असलेल्या रुग्णाला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळू शकतील. मालाड, मालवणी परिसरात कोरोनाबाधित तीन हजार २६७ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यापैकी एक हजार ४४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आयुक्तांनी पायी दौरा करीत मालाड (पूर्व) परिसरातील आप्पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेशनगर, देवकीनगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्वरनगर आदी भागांतील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक दुकानदार, व्यापारी, हॉटेलचालक, विविध व्यावसायिक यांच्याशीही संवाद साधला. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणार रुग्णकोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले तीन महिने महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटांवर रुग्णांना प्राधान्याने दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
CoronaVirus News : कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाच प्राधान्याने मिळणार खाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:28 AM