CoronaVirus News : रुग्ण वाढले; बहुतांश लक्षणविरहित; सक्रिय बाधितांची संख्या ३० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 08:26 AM2020-09-17T08:26:24+5:302020-09-17T08:26:41+5:30
मुंबईत आतापर्यंत पावणेदोन लाख बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक लाख ३४ हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज दोन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांच्या घरात पोहोचली तरी त्यापैकी केवळ सात हजार रुग्ण प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुंबईत आतापर्यंत पावणेदोन लाख बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक लाख ३४ हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ८२२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ सप्टेंबरपासून दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढू लागला आहे. सध्या २९ हजार अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तत्काळ बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी पालिकेने चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.
त्यानुसार मुंबईत आता दररोज १४ ते १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा २९ हजारांवर पोहोचला आहे. त्यापैकी २० हजारांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण सापडण्याचे प्रमाण इमारतीत जास्त असल्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइनची परवानगी दिली जात आहे.