मुंबई : कोविड-१९ आजाराने ग्रस्त तसेच चिंताजनक प्रकृती झालेल्या रुग्णांना प्लाज्मा दान करण्यासाठी भाटिया रुग्णालयाचे १७ डॉक्टर्स, परिचारिका व निमवैद्यकीय कर्मचारी आज पुढे आले. हे सर्व कर्मचारी कोविड-१९ आजारातून बरे झालेले आहेत.कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भाटिया रुग्णालयात विलगीकरणात होते आणि त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वैद्यकीय उपक्रमासाठी पुढाकार घेऊन डॉक्टरांनी एक उदाहरण घालून दिले आहे आणि कोविड-१९ आजारातून बरे झालेल्या इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे प्रोत्साहन देत आहेत. कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्यापासून भाटिया रुग्णालयाने ४००हून अधिक कोविड-१९ रुग्णांना यशस्वीरीत्या बरे करण्यात भूमिका बजावली आहे.वैद्यकीय संचालक डॉ. आर. बी. दस्तुर यांनी सांगितले, रुग्णालयातील कर्मचारी नि:स्वार्थभावाचे दर्शन घडवत स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी पुढे आले आहेत. यामुळे गंभीर आजारी असलेल्या कोविड रुग्णांना बरे करण्यात खूप मोठी मदत होणार आहे. त्यांच्या या कृतीमुळे बऱ्या झालेल्या रुग्णांनाही पुढे येऊन रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.प्लाझ्मा उपचारपद्धतीविषयीकॉन्व्हालेसंट प्लाज्मा थेरपी (सीपीटी) ही दात्याच्या शरीरातील अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) निष्क्रियपणे रुग्णाच्या शरीरात सोडण्याची (ट्रान्सफ्युजन) जुनी पद्धती आहे. यापूर्वीही अनेक संसर्गजन्य आजारांच्या व्यवस्थापनासाठी ही पद्धती वापरली गेली आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या मर्यादांपर्यंत यशस्वी ठरली आहे. आजारातून बºया झालेल्या रुग्णांच्या शरीरातून घेतलेल्या प्लाज्मामध्ये काही तटस्थताकारक (न्युट्रलायझिंग) अँटिबॉडीज असतात आणि त्यामुळे ग्राहक शरीरातील विषाणूला निष्क्रिय करण्यात मदत होते व ती व्यक्ती आजारातून पटकन बरी होते.
CoronaVirus News : कोविड योद्ध्यांनीच केले प्लाझ्मा दान; डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 6:57 AM