CoronaVirus News : आई गमावल्यावर जिद्दीने प्लाझ्मादान, कोरोनायोद्धा पोलिसाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:25 AM2020-07-16T01:25:19+5:302020-07-16T06:22:05+5:30
कोरोनाला हरवून कर्तव्यावर परतलेल्या खार पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक महत्त्वाचे योगदान दिले.
मुंबई : कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत असला, तरी कोविडयोद्धे न डगमगता या संकटाचा सामना करत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यावर मात करून ते पुन्हा सेवेत रुजू झाले. खार पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस नाईकाने तर सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. कोरोनामुळे आई गमावल्यानंतर पोलीस नाईक भिवाजी परब यांनी प्लाझ्मा दान केला.
कोरोनाला हरवून कर्तव्यावर परतलेल्या खार पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक महत्त्वाचे योगदान दिले. खार पोलीस ठाण्यातील १८ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ४ अधिकारी आणि १४ अंमलदार यांचा समावेश आहे. यातील १७ जण पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. यापैकी पोलीस नाईक भिवाजी परब यांनी कोरोनामुळे त्यांची आई गमावली. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. मात्र सर्व संकटांवर मात करून ते पुन्हा सेवेत परतले.
‘मे महिन्यात मला कोरोनाची लागण झाली. मग आईदेखील कोरोनाबाधित झाल्याचं चाचणीतून समजलं. आम्हा दोघांवर अंधेरीतल्या सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसºयाच दिवशी आईचं निधन झालं,’ अशा शब्दांत परब यांनी त्यांच्यावर कोसळलेलं संकट ‘लोकमत’ला सांगितलं.
‘आईच्या जाण्यानं खूप मोठा धक्का बसला. मी तणावात होतो. पण कुटुंबीयांनी, पोलीस दलातल्या मित्रांनी मला आधार दिला. त्यामुळे कोरोनावर मात करून कर्तव्यावर परतलो. त्यानंतर प्लाझ्मा दानाबद्दलची माहिती मिळाली आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं प्लाझ्मा दान केला,’ असं परब म्हणाले.
कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये प्लाझ्मा अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले.
खार पोलीस ठाण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्लाझ्मा दान करण्याची कल्पना सुचवली, ती इक्झिक्युटिव्ह इन्क्लेव्ह हॉटेलचे मालक राहुल रोरा यांनी. मे महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
१२ जूनला ते कोरोनावर मात करून घरी परतले. कोरोनातून बरे झालेले अतिशय मोजकेच जण प्लाझ्मा दान करत असल्याने राहुल रोरा अस्वस्थ होते. अधिकाधिक लोकांनी प्लाझ्मा दान करावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले यांच्याशी संपर्क साधला. रोरा यांच्या प्रयत्नांना काब्दुले आणि इतर पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)