मुंबई : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी दाखवलेली क्रूरता ही नाण्याची एक बाजू आहे. बहुसंख्य नागरिकांनी कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये, यासाठी घातलेल्या प्रतिबंधाचे पालन केले नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले. लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत चिंता व्यक्त करत व्यवसायाने वकील असलेल्या फिरदौस इराणी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सोमवारी इराणी यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी सामान्यांना मारहाण केल्याचे १३ व्हिडीओ आहेत. घराबाहेर पडलेली व्यक्ती घराबाहेर का पडली, याची साधी चौकशी न करता पोलिसांनी लोकांना काठीने मारहाण केली. त्यांच्या थोबाडातही दिली.यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदविले की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पोलीस क्रूरपणे लोकांना मारतात ही नाण्याची एक बाजू झाली. आपल्यात असे बरेच जण आहेत की ज्यांनी लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे नीट पाळली नाहीत. नियमांचे पालन केले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.तर, बदनाम व्यक्ती सगळीकडे आहेत. लोकांनी नियमांचे पालन केले नाही, असे मानले तरी पोलिसांना कोणालाही मारहाण करण्याचा अधिकार नाही, असे याचिकादारांच्या वकिलांनी म्हटले. त्यावर कोणत्या परिस्थितीत लाठी, अश्रुधूर किंवा फोर्स वापरायचा हे ठरवायला आम्ही बसलो नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. प्रत्येक परिस्थितीकडे एकाच दृष्टीने पाहू शकत नाही. लोक कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांना कठोर हातानेच हाताळले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले.>पुढील सुनावणी२१ सप्टेंबरलासामान्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम पोलिसांना दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी कसे हाताळावे, यावर सूचना करण्याचे निर्देश याचिकादारांना देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी ठेवली.
CoronaVirus News: पोलिसांची क्रूरता ही नाण्याची एक बाजू - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 4:56 AM