CoronaVirus News: डिस्चार्ज मिळून घरी परतलेल्या पोलिसाचा ४ तासांनी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:34 AM2020-05-30T03:34:49+5:302020-05-30T06:07:29+5:30
मुंबई पोलीस दलात कोरोनाने घेतले १६ जीव
मुंबई : वरळी पोलीस ठाण्यातील कोरोनाग्रस्त अंमलदाराला १० दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. त्यांचे रहिवाशांनी स्वागत केले. कुटुंबही आनंदात होते. मात्र, अवघ्या ४ तासांनी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६ झाली.
वरळी पोलीस वसाहतीत राहणारे अमलदार पत्नी आणि दोन मुलांसोबत राहण्यास होते. वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १८ मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम सेंटरमध्ये ठेवले. गुरूवारी रात्री ८ वाजता डिस्चार्ज मिळाला. रात्री १२ नंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डिस्चार्जनंतर मृत्यू झाल्याच्या वृत्ताला सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांनी दुजोरा दिला.
दुसरीकडे दहिसर पोलीस ठाण्यातील ५४ वर्षीय अम्ांलदाराचा २६ मे रोजी मृत्यू झाला. २७ मे रोजी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, राज्यभरात गेल्या २४ तासांत ११६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.