Join us

CoronaVirus News : मुंबईत १ लाख खाटांची तयारी; जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:34 AM

CoronaVirus News : ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सुमारे एक लाख खाटा मुंबईत उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मुंबई : ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत आहेत. मात्र यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने पालिका यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यानुसार विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर, रुग्णालय, अतिदक्षता विभाग तसेच आॅक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सुमारे एक लाख खाटा मुंबईत उपलब्ध करण्यात येणार आहेत.मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७ हजारपर्यंत पोहोचली आहे. ३ जूनपासून ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत मर्यादित कर्मचारी संख्येने खासगी व सरकारी कार्यालये, दुकाने आदी सुरू करण्यात आली आहेत. यामुळे काही दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढलेली दिसून येऊ शकते.जून अखेरीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ८४ हजार असलेली मुंबईतील खाटांची क्षमता एक लाखांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. मुंबईत सध्या ३० हजार सक्रिय रुग्ण आहेत. मात्र यापैकी लक्षणे असलेले व प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या साडेनऊ हजार एवढी आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढली तरी रुग्णालयात मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध असणार आहेत, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. केवळ अन्य खाटा नव्हे तर २५ जूनपर्यंत अतिदक्षता विभागात आणखी तीनशे खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तर ५ जुलैपर्यंत आणखी दोनशे खाटांचीे वाढ करण्यात येणार आहे.>एप्रिलमध्ये होत्या ३५०० खाटाएप्रिल महिन्यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या ३५०० होती. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्वतंत्र कोविड केअर केंद्र आणि स्वतंत्र कोविड रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढवून १२ हजार केली. आता ३० जूनपर्यंत खाटांची एकूण संख्या पंधरा हजारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर जुलैपर्यंत आणखीन पाच हजार खाटांची संख्या वाढेल. सध्या उपलब्ध ८४ हजार खाटांपैकी ६० हजार खाटा कोविड केअर केंद्र एक आणि दोन यासाठी राखीव आहेत. यामध्ये बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील तसेच कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तीला ठेवण्यात येते. संशयित रुग्णांना पालिकेने ताब्यात घेतलेल्या जागा, हॉटेल, नवीन बांधलेल्या इमारती अशा ठिकाणी ठेवण्यात येते. तर कोरोनाची लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर केंद्र दोनमध्ये ठेवण्यात येते. डॉक्टर आणि परिचारिका तिथे रुग्णांवर सतत लक्ष ठेवून असतात. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस