CoronaVirus News : प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 05:47 AM2021-04-12T05:47:20+5:302021-04-12T05:47:45+5:30
CoronaVirus News: 'आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. '
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता आता तरी नागरिकांनी स्वतः ही संसर्गाची साखळी तोडण्यास पुढाकार घेतला पाहिजे. एखाद्या आजाराची साथ आली की, नागरिकांनी जबाबदार वर्तन करून प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे.
आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. साथीच्या आजाराच्या प्रतिबंधाच्या तीन पायऱ्या असतात. पहिल्या पायरीत आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती, आजारापासून संरक्षण, हे दोन महत्त्वाचे बिंदू आहेत. यावर सरकार काम करत आहे; परंतु त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल, तर त्याची परिणामकारता वाढू शकेल. खासकरून पालक, शिक्षक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, समाजसेवकांनी एकत्रितपणे साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी काम केल्यास ताे प्रभावीपणे आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होईल.
कोरोनाने बाधित रुग्ण खोकल्यावर त्याच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. त्या तुषारांमध्ये हे अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येत असतात. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या श्वासातून ते विषाणू त्यांच्या श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. दुसरा प्रकार म्हणजे खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूंच्या वस्तूंवर पडतात. म्हणजे टेबल, खुर्ची, दरवाजा, बसच्या सीटस् इत्यादी. या वस्तूंवर हे विषाणू बराच काळ जिवंत राहतात. मग अशा वस्तूंना कुणी निरोगी व्यक्तीने हस्तस्पर्श केला आणि त्याचे ते हात नंतर स्वतःच्या चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला लावले, तर त्या निरोगी व्यक्तीला या विषाणूंचा संसर्ग होतो. संसर्गाचे मार्ग लक्षात घेता आता तरी समाजात शारीरिक अंतर राखण्याची जबाबदारी यंत्रणानी अमलात आणण्यासह नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. मास्कचा नियमित वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळणे सक्तीचे आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशन (माजी अध्यक्ष)
जाणून घ्या, किती जणांना आपल्याकडून होऊ शकतो संसर्ग
काेराेना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. अशा बहुतेक वाहकांमध्ये कोणती लक्षणे दिसतही नाहीत. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड झाकून घेतले, तर संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते.
हा विषाणू, ज्याला संसर्ग झाला आहे तिच्यातील संसर्गकाळातीललाळ, थुंकी, विष्ठेत असतो.
संसर्ग झालेल्या एकाकडून इतरांना संसर्ग होण्याची सरासरी संख्या म्हणजे मानवी संक्रमण पल्ला २.२ ते ३.१ यादरम्यान आहे, म्हणजे संसर्ग झालेली एक व्यक्ती साधारणपणे २.२ ते ३.१ व्यक्तींना संसर्ग पोहोचवू शकते.
प्रत्यक्षात लोकांमध्ये अंतर राखून आपण संक्रमणात कपात करून संसर्गाचे प्रमाण कमी करू शकताे.