CoronaVirus News: प्रचार, कुंभमेळ्याहून परतलेले ठरणार सुपरस्प्रेडर; राज्यात संक्रमण वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:28 AM2021-05-01T06:28:02+5:302021-05-01T06:30:06+5:30
पाच राज्यांतील निवडणूक प्रचारसभांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवित मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत.
मुंबई : पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार आणि नुकताच हरिद्वार येथे झालेला कुंभमेळा यासाठी राज्यातून अनेक जण गेले होते. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यातून विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते तिथे गेले होते. तर हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याला राज्यातील शेकडो भाविकांनीही हजेरी लावली होती. आता हे राज्यात परतले असून, यामुळे कोरोनाचे संक्रमण राज्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाच राज्यांतील निवडणूक प्रचारसभांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवित मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर, पाच राज्यांतील निवडणुकांमधील प्रचाराला हजेरी लावणारे नेते, कार्यकर्ते आणि कुंभमेळ्याला उपस्थित राहिलेल्या भाविकांमुळे राज्यांतही कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातून या पाचही राज्यांतील निवडणूक प्रचारासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह काही पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांची कुमक तिथे तैनात केली होती. त्यातील बहुतेक नेते, कार्यकर्ते आता महाराष्ट्रात परतले आहेत. मात्र, सुदैवाने यातील कुणालाही कोरोनाची लागण झालेली नसली तरी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता, त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबादमधून भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर या पश्चिम बंगालमध्ये तीन महिने प्रचारासाठी गेल्या होत्या. पुण्यातून भाजपच्या दोन आमदारांसह १५ ते २० कार्यकर्ते पश्चिम बंगालला प्रचारासाठी गेले होते. यापैकी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आलेले नाही. आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी सभागृह नेते धीरज घाटे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते. बंगालमधील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी दौरे केल्याचे सांगितले. ते परत येऊन दोन-तीन दिवस झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही कोरोनाबाधित नसल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. जामनेर येथील भाजपचे आमदार गिरीश महाजन हेही जवळपास २२ दिवस बंगालमध्ये होते. त्यांच्यासोबत नाशिक येथील स्वीय सहायक स्वप्नील नन्नवरे हेही होते.
औसा मतदारसंघातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हेही बंगालला गेले होते. ते कोरोनामुक्त आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी सांगितले. याशिवाय, विनोद तावडे, आशिष शेलार, निरंजन डावखरे, मोहन मते हेही बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी दोन दिवस पश्चिम बंगाल व एक दिवस आसाममध्ये गेले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे दुसऱ्या टप्प्यात या दोन्ही राज्यांत प्रचारासाठी गेले होते. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेदेखील स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये गेले होते. दोन दिवसांचा प्रचार आटोपून ते परत आले. परत आल्यावर कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.
शेतकरी आरक्षणाचे नेते शैलेश अग्रवाल हेही आसामात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र तेही कोरोना पॉझिटिव्ह आलेले नाहीत. बुलडाण्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर व खामगाव शहर युवा मोर्चाचे राम मिश्रा आणि नगेंद्र रोहणकार हे पश्चिम बंगालमधील सहाव्या टप्प्यातील निवडणुकांदरम्यान तिथे गेले होते. २२ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर ते स्वगृही परतले आहेत. यापैकी एकालाही कोरोना झालेला नाही.
दरम्यान, काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज साठे हे आसाममध्ये, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि संजय दत्त हे तामिळनाडूमध्ये, तर रवींद्र दळवी हे केरळला प्रचारासाठी गेले होते, पण यापैकी कोणालाही कोरोना झाला नाही. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या पक्षाच्या निरीक्षक म्हणून केरळला गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती.
पहिल्या लाटेत सोलापुरात असताना त्यांना कोरोना झाला होता. तसेच, सोलापुरातील काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते हे कोलकाता, उत्तर कोलकाता मतदारसंघात चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी गेले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार निवडीची जबाबदारी होती. ही जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरापूर्वीच पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत.