मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ८९२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात आले होते. मात्र हे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी ठरल्याने व श्रमिक विशेष ट्रेनची कमतरता जाणवू लागल्याने या कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले जात आहे. मध्य रेल्वेच्या १८३ डब्यांचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले आहे. याचा वापर श्रमिक विशेष ट्रेनसाठी केला जाईल.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. दररोज ३७५ आयसोलेशन कक्ष तययार केले जात होते. मात्र रेल्वे प्रशासनाला श्रमिक विशेष ट्रेन कमी पडू लागल्यामुळे आता देशभरातील ५ हजार आयसीएफ डब्यांपैकी ६० टक्के डबे श्रमिक ट्रेनसाठी वापरण्यात येतील.
४८२ पैकी माटुंगा वर्कशॉपमधील १२० आणि परळ वर्कशॉपमधील ६३ गाड्यांचे रूपांतर श्रमिक विशेष ट्रेनमध्ये केले आहे. कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले आयसोलेशन कक्ष बिनकामी ठरले आहेत. याची जाणीव झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रवासी डब्यात रूपांतर; श्रमिक ट्रेनसाठी वापर
आयसोलेशन कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले जात आहेत. त्याची पूर्वतयारी सुरू असून गाड्यांचे पडदे काढण्यात आले आहेत. डब्याचा मधला बर्थ, शिडी पुन्हा लावली आहे. आॅक्सिजन सिलेंडर काढण्यात आले आहे. आता या गाड्यांचा वापर श्रमिक विशेष ट्रेनसाठी केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली. तर, तयार केलेले आयसोलेशन कक्ष पडून आहेत. अद्याप कोणत्याही आयसोलेशन कक्षाला प्रवासी डब्यात रूपांतर केले नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.