मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस कमी होत असताना दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात 5246 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 11277 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यत एकूण 44 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 284 एक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे, ते पाहून आपण अधिक काळजी घेतल्यास व नियम पाळल्यास कोरोनाची लाट रोखू शकू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असून एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल 63 टक्के घट झाली आहे. या मोहिमेमुळे 3 लाख 57 हजार आयएलआय आणि सारीचे रुग्ण देखील आढळले असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
''माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेमुळे 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. तसेच या मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, परदेशात नियंत्रणात आल्यानंतर आता कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यातही पुन्हा रुग्णवाढीचा धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा कोविड वाढीच्या स्थितीचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून 1 डिसेंबरपर्यंत राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील कोविडच्या चढ-उताराच्या स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे
सक्रिय रुग्णांचा भार कमी झाल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. ऑगस्ट पंधरवड्यानंतर ते सप्टेंबर अखेरीस प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 10 टक्क्यांनी प्रमाण वाढवून आम्ही सर्व जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. या माध्यमातून तेथील कोविड केंद्र, सेवा, ऑक्सिजन पुरवठा - मागणी हे सर्व मुद्दे यात पडताळण्यात येणार आहेत.
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी गरजेची
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, रुग्ण निदानाचे प्रमाण घटत असले तरीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे बदल सामान्यांनी जीवनशैलीत स्वीकारले पाहिजेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.