- मनोहर कुंभेजकर मुंबई : के पश्चिम वॉर्डमध्ये मोडणाऱ्या अंधेरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना येथील गृहनिर्माण सोसायट्यांतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांत येथील ३४२ इमारतींमध्ये जाऊन आमची टीम स्क्रिनिंग करणार आहे, अशी माहिती परिमंडळ ४ओचे पालिका उपयुक्त रणजित ढाकणे यांनी दिली.अंधेरी येथील गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतींमधील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. गेले साडेतीन महिने के पश्चिम वॉर्डचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य खाते, पाणी खाते व घनकचरा व्यवस्थापन आदी आपली अविरत सेवा येथील नागरिकांना देत आहेत. तसेच या भागातील इमारतीमध्ये गेले २१ दिवस आमचे ४० जणांचे वैद्यकीय पथक नागरिकांचे स्क्रिनिंग करत आहे, असे त्यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह व लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये ५० आॅक्सिजन सिलिंडरसह सुसज्ज कोविड सेंटर उभारले असून, तसेच येथे खासगी हॉस्पिटलच्या मदतीने कोविड बेड्स आणि आयसीयू बेड उपलब्ध केले आहेत. पालिकेच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये खास महिलांसाठी २६ बेड उपलब्ध करून दिले आहेत. तर बीएसईएस रुग्णालय आणि इतर रुग्णालय कोविडसाठी पालिकेने घेतली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या मोहिमेत स्थानिक आमदार अमित साटम यांच्यासह काही नगरसेवक यांचे सहकार्य लाभत असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.वॉररूमचा होतोय फायदा : आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या संकल्पनेतून सर्व २४ वॉर्डमध्ये वॉररूम सुरू आहेत. याचा मोठा फायदा अंधेरीकरांना होत असून कोरोना रुग्णांना वेळीच बेड उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
CoronaVirus News: अंधेरीत ३४२ सोसायट्यांतील रहिवाशांचे होणार स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:25 AM