CoronaVirus News : भरपावसात सुरूआहे संसर्ग, लोकवस्तीत कोरोनाचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:07 AM2020-07-17T07:07:26+5:302020-07-17T07:08:05+5:30
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भरपावसातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या वस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू असून, नागरिकही यासाठी सहकार्य करत आहेत.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. विशेषत: उपनगरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, चाळी, झोपड्या आणि इमारतींमध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. भरपावसातही या कामाला ब्रेक लागलेला नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भरपावसातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या वस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू असून, नागरिकही यासाठी सहकार्य करत आहेत.
अंधेरीसह जोगेश्वरी पूर्व विभागात कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जोगेश्वरीतील बहुतांश भाग झोपडपट्टीबहुल असल्यामुळे कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या अंतर्गत विविध विभागात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या काळात एन.वाय.के. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लक्ष सामाजिक प्रतिष्ठान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या के पूर्व विभागांतर्गत अनेक स्वयंसेवक दिवसभर कार्य करत आहेत. सारीपूत नगर येथील स्वयंसेवक भानुदास सकटे व सुनील बोर्डे, विनोद काकडे, निखिल सुतार, अजय साळवे हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भरपावसातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य करत आहेत.
सध्या एमआयडीसी, मालप्पा डोंगरी, सारीपूत नगर, सर्वोदय नगर, शामनगर, अंधेरीतील कनकिया सोसायटी, मुळगाव डोंगरी, सुभाष नगर, कोडींविटा, गणेशवाडी, आंबेडकर नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, बीपी, डायबेटिस अन्य आजारांबाबत माहिती घेत ती नोंद करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सुरू आहे. येथील रहिवासीही सहकार्य करत आहेत.
सारीपूत नगर येथील स्वयंसेवक भानुदास सकटे, सुनील बोर्डे, विनोद काकडे, निखिल सुतार, अजय साळवे हे कोरोना संसर्ग झालेल्या लोकवस्तीत सर्वेक्षण करतआहे़त.