मुंबई : पोलीस दलातील कोरोनाग्रस्ताची संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. मुंबई पोलीस दलातील एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा शनिवारी पहाटे या विषाणूमुळे मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचे वय अवघे 32 वर्षे होते.त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आजच मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या बाधेमुळे मुंबई पोलीस दलातील हा सातवा तर राज्य पोलीस दलातील दहावा बळी ठरला आहे. त्याशिवाय राज्यभरात जवळपास 1100 अधिकारी, अंमलदार कोरोना बाधित झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यातील वाढत्या संसर्गामुळे पोलीस वर्तुळ व कुटूंबियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहूनगर येथे कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने ताप व सर्दी असल्याने 5 दिवसापासून आजारी रजा काढून प्रतीक्षानगरातील घरी आराम करीत होते. त्यांनी 13 मे रोजी सायन रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्याचा अहवाल मिळाला नसलातरी कोरोना झाल्याच्या शक्यतेमुळे ते चिंतेत व अस्वस्थ होते. पहाटे पाचच्या सुमारास घरातील मंडळीना ते बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे आतापर्यंत सातजणाचा बळी गेला असला तरी राजपत्रित (गेझेटेड ) दर्जाच्या आधिकार्ऱ्यांचे पहिलेच अधिकारी आहेत. यापूर्वीपर्यंतचे सहाजण कॉन्स्टेबल ते सहाय्यक फोजदार दर्जाचे अंमलदार होते.