CoronaVirus News: शरद पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; सिल्व्हर ओकवरील 12 जणांना बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:02 AM2020-08-18T05:02:30+5:302020-08-18T05:28:46+5:30
दरम्यान, शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवरील बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच जण पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच सिल्व्हर ओकवरील ५० कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यापैकी काही जणांचे कोरोना अहवाल अद्याप आले नसले तरी बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांपैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याने कराड येथील रुग्णालयात दाखल केले होते. शरद पवार यांनीही अलीकडेच कराड दौरा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणीही करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
>‘काही दिवसांपूर्वीच केली अँटिजन टेस्ट’
शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अँटिजन टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, आता खबरदारी म्हणून त्यांना राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.