CoronaVirus News: रेल्वेमंत्री गोयल यांना शिवसेना, काँग्रेसचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:11 AM2020-05-26T03:11:12+5:302020-05-26T06:35:21+5:30
श्रमिकांची यादी द्या, हव्या तेवढ्या गाड्या सोडतो अशी भूमिका रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी घेतली.
मुंबई : मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर, श्रमिकांची यादी द्या, हव्या तेवढ्या गाड्या सोडतो अशी भूमिका रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी घेतली. यासंदर्भात अगदी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत गोयल यांनी ट्विट केले होते. त्यावर सोमवारी शिवसेना आणि काँग्रेसकडून पलटवार करण्यात आले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वे खात्यावर टिकास्त्र डागले. सगळ्या गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणे हा आडमुठेपणा आहे. राज्य सरकारने १५७ गाड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यातल्या ११५ गाड्या मुंबईसाठी आहेत. आता रेल्वे मंत्रालय म्हणतयं की, सगळ्या १५७ गाड्यांतील प्रवाशंची यादी आम्हाला आताच पाहिजे. वास्तविक आदल्या दिवशी आपण यादी देत असतो. त्याप्रणाणे काम व्यवस्थित होत असते. त्यांनी जादा गाड्या द्याव्यात आपण जादा याद्या देवू. पण सगळ्या गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणे म्हणजे, आडमुठेपणा आहे, अश्ी टीका थोरात यांनी केली.
महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार आहे, या भूमिकेतून बाहेर पडलात आणि राज्य म्हणून पाहिलेत तर याद्या मागण्याचा प्रश्न येणार नाही, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हाणला. पीयुष गोयल हे राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. हे केंद्रातील प्रत्येक मंत्र्याने समजून घेतले पाहिजे.
सरकारने न मागताही महाराष्ट्रातून अनेक गाड्या याआधी यादीशिवाय सुटलेल्या आहेत. नागपूर, पुण्यातून सुटल्या आहेत, त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यामुळे यादी कशा मागत बसता, असा सवाल करतानाच सध्याच्या वातावरणात रेल्वेमंत्र्यांची चीडचीड होणे स्वाभाविक आहे, असा टीकाही राऊत यांनी हाणला.तर, पीयुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची मर्यादा राखली पाहिजे, असा सल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.