Join us

CoronaVirus News: काेराेनानंतर औषधांचे ‘संकट’; बिले थकल्याने शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:18 AM

औषधे पुरवल्यानंतरही हाफकीन संस्थेकडे सुमारे ९० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे औषध पुरवठादारांनी हाफकीन संस्थेला पत्र लिहून थेट आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.

- स्नेहा मोरे मुंबई : कोरोनाशी लढताना रुग्णसेवेसमोर औषधांच्या तुटवड्याचे नवे आव्हान आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा ७० टक्के तुटवडा भासत असून, थकीत देयकांअभावी औषधांचा पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. औषधे पुरवल्यानंतरही हाफकीन संस्थेकडे सुमारे ९० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे औषध पुरवठादारांनी हाफकीन संस्थेला पत्र लिहून थेट आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. शिवाय थकबाकी मिळाली नाही तर औषध पुरवठा थांबविण्याचा इशाराही दिला आहे. औषध पुरवठादारांनी २०१९-२० या वर्षात पुरवलेल्या औषधांची देयके थकीत आहेत. साधारणत: १०५ कोटी रुपयांच्या थकीत देयकांपैकी हाफकीन संस्थेने १० कोटी रुपये दिले आहेत. हाफकीनचे संचालक संदीप राठोड आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या प्रधान सचिवांना २०१९-२० पासून ९० कोटी रुपये थकीत रक्कम देण्याबाबत किमान १० ते १२ वेळा पत्रव्यवहार केला. तरीही थकीत रक्कम मिळत नसल्याचे औषध पुरवठादारांनी म्हटले आहे. एन्ट्रानील, सायट्रेट इंजेक्शन, ॲमोक्सीन क्लॅव्ह इंजेक्शन, अँटी स्नेक व्हेनेम, हेपॅटायटीस, बी, इम्युनीग्लोबिन, पॅरासिटामॉल, स्टराईल वॉटर तसेच कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे उपलब्ध नाहीत. तसेच, हँड ग्लोव्हज देखील बाहेरून आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे, अशी माहिती ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचे अभय पांडे यांनी दिली आहे.  ...तर आरोग्य व्यवस्था कोलमडेल कोरोना संसर्ग वाढताना आणि या नव्या लाटेला तोंड देताना डॉक्टरांकडील आवश्यक ती साधन सामग्री अपुरी असल्यास संपूर्ण राज्यावर आरोग्याचे संकट कोसळेल, अशी चिंता व्यक्त करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारने तातडीने वैद्यकीय साहित्याचा साठा पुरवठा करावा असे आदेश दिले. राज्य सरकारने यावर तातडीने कारवाई करीत आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, नाहीतर आरोग्यव्यवस्था कोलमडेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. काही विपरीत घडल्यास प्रशासनाची जबाबदारी मी वृद्ध विधवा आहे. देयके हॉस्पिटल प्रशासनाकडून थकली आहेत. त्यातच सध्या असलेली कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण यामुळे मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत देयके आणि त्यावर १८ टक्क्यांनी व्याज अशी सर्व रक्कम मला देण्यात यावी. अन्यथा माझे किंवा माझ्या कुटुंबीयांचे काही झाल्यास त्याला डीएमईआर, जे.जे. हॉस्पिटल व सेंट जॉर्ज हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असेल, असे शीतल मेडिकलच्या मालक दक्षाबेन लक्ष्मीचंद शहा यांनी पत्रात म्हटले.