CoronaVirus News : महापालिकेच्या मंडयांमधील दुकानांचे शटर उघडणार, प्रतिबंधित क्षेत्रात सहायक आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:33 AM2020-06-25T01:33:17+5:302020-06-25T01:33:28+5:30
तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रात मंडई सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित सहायक आयुक्तांना देण्यात आला आहे.
मुंबई : पुन:श्च हरिओमअंतर्गत पालिकेच्या अखत्यारितील मंडयांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आली. त्याचबरोबर आता इतर वस्तू, साहित्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मंडयांमधील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरू राहणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रात मंडई सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित सहायक आयुक्तांना देण्यात आला आहे. मुंबईत ९२ किरकोळ मंडया, १६ खासगी व ९५ मंडया समायोजन आरक्षणअंतर्गत प्राप्त झाल्या आहेत. २३ मार्च २०२०पासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर मंडयांमधील अत्यावश्यक वस्तू, सेवा देणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद करण्यात आली होती. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ५ जून २०२० पासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम व विषम तारखेस खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध मंडयांतील व्यापारी संघटना व त्यांच्या प्रतिनिधींनी मंडयांतील इतर दुकाने सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाला लेखी विनंती केली होती. यावर चर्चा करून महापालिकेने मंडईतील दुकाने सुरु करण्यास या संघटनांना परवानगी दिली आहे.
>व्यापारी संघटनांकडून सुरक्षेची हमी
मास्क-हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर यांची व्यवस्था करणे, प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तापमान तपासणे, सुरक्षित अंतर राखणे या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंडयांना करावे लागणार आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खासगी सुरक्षारक्षक नेमले जातील.
>असे आहेत नियम
मंडईतील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरू राहतील.
दुकानांसंबंधी शासनाने आणि पालिकेने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार आहे.
मंडईमधील सर्व दुकाने रविवारी बंद राहतील. तसेच येथे किरकोळ स्वरूपातीलच व्यवसाय करता येईल, घाऊक व्यवसाय करता येणार नाही.
थुंकण्यास व अस्वच्छता करण्यास मनाई आहे. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल. दुकानदारांनी वस्तूंची अदलाबदल अथवा वस्तू परत घेण्याचे धोरण ठरवू नये.
उपाहारगृह (हॉटेल/कॅन्टीन) बंद राहतील. काम करण्यासाठी फक्त दोन व्यक्ती असतील.