CoronaVirus News: ऑनलाइन' शिक्षण आणि कंटाळलेले चिमुरडे !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:32 AM2020-06-17T01:32:29+5:302020-06-17T01:32:43+5:30
पालकांच्या प्रतिक्रिया; हा तर मुलांवर अत्याचारच
मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा प्रभाव अधिक असलेल्या ‘रेड झोन’मध्ये आॅनलाइन’ पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार अनेक शाळांमध्ये प्री प्रायमरीच्या मुलांसाठी 'आॅनलाइन' वर्ग सोमवारपासुन सुरू करण्यात आले असून विद्यार्थी याला फारसा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. याबाबत काही पालकांनी मुलांच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ला कळवल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
मी या न्यू क्लास टीचरला ओळखतच नाही !
'क्लासमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले नवे वर्गशिक्षक युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. मुलांना कविता बोलून दाखवत होते. मात्र नव्या शिक्षकांशी मोबाइलवर मैत्री करण्याची मानसिकता मुलांमध्ये दिसत नाही. तसेच इंटरनेट समस्येमुळे आॅडियो आणि व्हिडीओ नीट ऐकूच येत नव्हते. त्यामुळे मुलांनी रेंगाळण्यास सुरुवात केली.
वर्ष फुकट गेले तरी चालेल !
‘आॅनलाइन’ शिक्षण देऊन मुलांचे डोळे आणि कान खराब करण्याची तयारी काही शिक्षणसंस्था करत आहेत. प्री प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांबाबत काहीच विचार शाळा करत नसून माझ्या मुलांचे एक वर्ष फुकट गेले तरी चालेलपण मी आॅनलाइनला मुलाला बसवणार नाही.
‘मम्मा, संपली का मिटिंग?’
सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन वर्गाबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी एका शाळेत अॅपमार्फत मिटिंग घेण्यात आली. त्यात विद्यार्थी आणि पालकांचा समावेश होता. मात्र ही मिटिंग सुरू झाल्याच्या अवघ्या दहा मिनिटात ‘मम्मा, संपली का मिटिंग?’ असा प्रश्न माझ्या मुलीने विचारण्यास सुरवात केली. त्यामुळे पुढे ती किती वेळ या वर्गात बसेल याबाबत शंका आहे.
‘मुझे नही बैठना क्लास मे’ : ‘कोरोना चला जायेगा तभी स्कल शुरु होगा और मे क्लासरूम मे अपने दोस्तो के साथ पढुंगा, आय प्रॉमिस, मगर मुझे ये मोबाईलवाली क्लास मे नही बैठना है’, असे मुलाकडून थेट सांगण्यात आले आणि अखेर मलाच त्या सेशनला बसावे लागले.