Join us

CoronaVirus News: सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव ‘विशेष पोलीस’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 5:25 AM

कोरोना रोखण्यासाठी मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या व कोरोना रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व उपाय करावेत, असे शिंदे म्हणाले. कोकण, पुणे व नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची आढावा बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यावेळी उपस्थित होते. निधीची गरज असेल तर प्रस्ताव पाठवा. डीपीसी व एसडीआरएफमधून तथा नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.उपाययोजना आखण्याचे निर्देश गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टिकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉल सेंटर कार्यान्वित करणे, आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या