मुंबई : मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची द्विशतकपूर्ती झाली असतानाच ४ विभागांत ३०० पेक्षा अधिक तर ११ विभागांत २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुपटीचा कालावधी नोंदविण्यात आला आहे. विशेषतः वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, धारावी, माहिम आणि दादर परिसरात रुग्ण आढळून येण्याचा कालावधी वाढला असून, या कामगिरीबाबत महापालिकेवर स्तुतिसुमने उधळली जात आहेत.
कोरोनाला हरविताना ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली गेली. मास्कचा नियमित उपयोग होत आहे. हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिक करीत आहे. मुंबई महानगरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. याचे फलित आता समोर येत आहे. परिणामी, मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दरदेखील आता ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. असे असले तरी महानगरपालिका प्रशासन हुरळून न जाता कोविडला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिकाधिक वेग देताना दिसत आहे.
चेस द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही; भेटी, नागरिकांची पडताळणी, पोलिसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधविषयक बाबी आणि मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.