मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासन मागील पाच महिन्यांपासून कंबर कसत आहे. आता पालिका प्रशासनाकडून २४ विभागांपैकी संसर्गाचे प्रमाण अधिक असणाऱ्या मुख्य दहा विभागांवर लक्ष देण्यात येणार आहे. या दहा विभागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता ४६ टक्के असून हे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या आठवड्यापासून पालिकेच्या वतीने काम करण्यात येणार आहे.पालिकेच्या आर नॉर्थ दहिसर, आर साऊथ कांदिवली, आर सेंट्रल बोरीवली, एस भांडुप, एन घाटकोपर, टी मुलुंड, जी नॉर्थ दादर-माहीम, एम ईस्ट गोवंडी, पी नॉर्थ मालाड आणि एल कुर्ला या विभागांचा समावेश आहे. या विभागांमध्ये मुख्यत: रुग्णनिदान व मृत्युदर अधिक असल्याचे निरीक्षण पालिका प्रशासनाला आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या विभागांतील झोपडपट्टी व चाळींमध्ये अँटिजेन चाचणी व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याविषयी सांगितले, या विभागांतील प्रतिबंधित क्षेत्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या विभागांत घरोघरी चाचणी करण्यावर पालिकेच्या वतीने भर देण्यात येणार आहे. तसेच, या विभागांत केलेल्या कामाविषयी विभाग अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेण्यात येणार आहे.
CoronaVirus News : कोरोनावर नियंत्रणासाठी पालिकेचे दहा विभागांवर विशेष लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 1:30 AM