CoronaVirus News: कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात राज्यात नवीन नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:38 PM2020-05-10T16:38:16+5:302020-05-10T16:46:50+5:30
राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
मुंबई: कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने याबाबत शनिवारी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, एखाद्या रुग्णामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोनाच्या रूग्णासाठी सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशीही ताप नसल्यास त्याला दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावं अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच डिस्चार्जनंतर या संबंधित रूग्णास 7 दिवस होम क्वारंटाईन गरजेचे राहिल असं नमूद करण्यात आले आहे. या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या हातावर ७ दिवसांचा स्टॅम्प मारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डिस्चार्ज देण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळल्यास तर त्या 'डेडिकेटेड कोविड सेंटर'मध्ये दाखल केलं जाणार आहे.
कोरोनाची मध्यम लक्षणं असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय लक्षणांचे निराकरण झाल्यानंतरच रजा दिली जाईल. त्यांच्यात तीन दिवसांपर्यंत ऑक्सिजन पातळी कायम राखण्याची क्षमता आहे का, हे तपासले जाईल. ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा जास्त असेल अशांना लक्षणे सुरु झाल्यापासून 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात यावा. या रुग्णांना डिस्चार्ज करतांना पुन्हा कोरोना चाचणीची गरज नाही. तसंच डिस्चार्जनंतर सात दिवस होम क्वारंटाईन करावे असं या नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणं आढळून न येता त्यांची कोरोनाची चाचणी देखील नेगेटिव्ह येणं आवश्यक आहे. संबंधित कोरोना रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची ही चाचणी कोरोनाची कोणतेही लक्षणं न आढळून आल्यास करण्यात येणार आहे. या रुग्णांना लक्षणे आढळल्यापासून डिस्चार्ज करेपर्यंतचा कालावधी किमान 10 दिवस असावा, असं नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे.