CoronaVirus News : कोरोना रोगाला ‘शिंगावर’ घेणारा स्वीडन!, वेगळ्या वाटेवरील प्रयत्नांकडे जगाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 05:01 AM2020-05-18T05:01:01+5:302020-05-18T06:51:26+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : स्वीडनमध्ये कोरोनाच्या मुकाबल्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार सरकार नव्हे तर आरोग्य यंत्रणांना आहे. त्यानुसारच देशातील साथीच्या आजारांचे विशेषज्ञ अ‍ॅडर्स टेगनेल यांनी सखोल अभ्यासाअंती हे हटके धोरण स्वीकारले आहे.

CoronaVirus News: Sweden taking corona disease on 'horns'! | CoronaVirus News : कोरोना रोगाला ‘शिंगावर’ घेणारा स्वीडन!, वेगळ्या वाटेवरील प्रयत्नांकडे जगाचे लक्ष

CoronaVirus News : कोरोना रोगाला ‘शिंगावर’ घेणारा स्वीडन!, वेगळ्या वाटेवरील प्रयत्नांकडे जगाचे लक्ष

googlenewsNext

- संदीप शिंदे

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला. स्वीडनमध्ये मात्र सार्वजनिक वाहतूक, मॉल, बाजारपेठा, कॅफे, रेस्टॉरण्ट आणि शाळासुध्दा सुरू आहेत. माझी मुलं पोहायला आणि पिआनो शिकायलाही जातात. कोरोनाचे संक्रमण रोखण्याऐवजी लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनीटी) वाढविण्यावर भर दिला जातोय. अंगावर आलेल्या कोरोनाला आम्ही जणू शिंगावरच घेतले आहे, अशा शब्दात स्वीडन येथील परिस्थितीचा आलेख तिथे स्थायिक असलेल्या सुमीत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडला.
स्वीडनमध्ये कोरोनाच्या मुकाबल्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार सरकार नव्हे तर आरोग्य यंत्रणांना आहे. त्यानुसारच देशातील साथीच्या आजारांचे विशेषज्ञ अ‍ॅडर्स टेगनेल यांनी सखोल अभ्यासाअंती हे हटके धोरण स्वीकारले आहे. या रोगावर लस किंवा औषध उपलब्ध नाही. ते नजीकच्या महिन्यांतही ते दृष्टिपथात नाही. त्यामुळे कोरोनाला रोखणे अवघड आहे. तसेच, लस उपलब्ध होईपर्यंत लॉकडाउनचा पर्याय स्वीकारणेसुध्दा परवडणार नाही. म्हणूनच लॉकडाउन न करता लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केले होते. देशातील बहुसंख्य लोकांना या रोगाची लागण होईल. मात्र, ते हर्ड इम्युनीटीच्या जोरावर बहुसंख्य जण त्यावर मात करतील. प्रकृती बिघडेलेल्या रुग्णंना सर्वोत्तम उपचार दिल्याने अनेक जण बरे होतील. तर काही हजार लोकांना प्राण गमवावे जातील हे सरकारने गृहित धरले आहे.
कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत असली तरच तपासण्या केल्या जातात. सरकारी आकडेवारीनुसार बाधितांची संख्या २३ हजारांच्या आसपास आहे. तर, मृतांचा आकडा २,८५४ आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या तर बाधितांची संख्या वाढू शकेल असे अनेकांचे मत आहे. परंतु, तूर्त सरकार तसे करत नाही. या आजाराचा सर्वाधिक धोका वयोवृध्दांना आहे. माझे आई - वडील माझ्यासोबत राहत असल्याने आम्ही त्यांची काळजी घेतोच. परंतु, वृध्दाश्रमात असलेल्या वडिलधाऱ्यांनी बाहेर पडू नये आणि बाहेरून कुणी त्यांना भेटायला जाऊ नये अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. येथील आरोग्य व्यवस्था भक्कम असून त्यांचे काम अत्यंत प्रभावी पद्धतीने सुरू आहे. स्वीडनने जे धोरण स्वीकारले आहे ते यशस्वी होईल असा विश्वास रहिवाशांना असल्याचे सुमीत सांगतात.

...तर शाळेतून नोटीस येते

देशातील सर्व शाळा सुरू असल्या तरी काही पालक भीतीपोटी आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही; परंतु अशा पद्धतीने शाळा बुडविणे हा नियमभंग असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशा नोटिसा व्यवस्थापनाकडून धाडल्या जात असल्याचे सुमीत यांनी सांगितले.

जनता सजगतेने वागते : मास्क, सॅनिटायझर्सची कुठेही सक्ती नाही. ज्यांना शक्य आहे ते घरूनच काम करतात. कुठेही फिरण्याची मुभा असली तरी विनाकारण भटकताना कुणी दिसत नाही. बार, रेस्टॉरंटमध्ये ५० पेक्षा जास्त लोक जमत नाहीत. गर्दी होईल असे उत्सव साजरे होत नाहीत. लोकसंख्या कमी असल्याने सोशल डिस्टन्सिंग राखण्यात अडचणी येत नाहीत. सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन केले जाते. इथली जनता आणि सरकार यांचा एकमेकांवर अतूट विश्वास आहे. त्यामुळे असे धाडसी प्रयोग होऊ शकतात, असेही मतही सुमीत यांनी व्यक्त केले.

Web Title: CoronaVirus News: Sweden taking corona disease on 'horns'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.