Join us

CoronaVirus News: कोरोना युद्धात रतन टाटांचं आणखी एक पाऊल पुढे; महाराष्ट्र आणि यूपीत ४ रुग्णालय उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:54 PM

आजवर जवळपास २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना टाटा ट्रस्ट तर्फे सुरक्षा साधने पुरवली गेली आहेत.

मुंबई: टाटा ट्रस्ट चार सरकारी रुग्णालयांच्या इमारतींमध्ये सुधारणा करून त्याठिकाणी कोरोनाचे उपचार केंद्र विकसित करत आहे. यापैकी दोन रुग्णालये महाराष्ट्रात तर दोन उत्तर प्रदेशात आहेत. या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणारे रुग्ण आणि बाह्य रुग्ण यांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा कायमस्वरूपी असणार आहेत. कोरोनावरील उपचार हे जरी या रुग्णालयांचे सध्याचे उद्धिष्ट असले तरी आपापल्या परिसरांमधील लोकांसाठी आरोग्य सेवासुविधा पुरवण्याचे काम पुढे देखील कायम सुरु राहील.

टाटा ट्रस्टने हे काम चेअरमन रतन एन टाटा यांनी आपल्या निवेदनात जाहीर केल्याप्रमाणे हाती घेतले आहे. रतन टाटा यांनी नमूद केले होते की, "आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोरोना विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे."

महाराष्ट्रामध्ये ही रुग्णालये सांगली (५० बेड्स) आणि बुलढाणा (१०६ बेड्स) येथे तर उत्तर प्रदेशात गौतम बुद्ध नगर (१६८ बेड्स) आणि गोंडा (१०६ बेड्स) याठिकाणी आहेत.  उत्तर प्रदेशातील उपचार केंद्रे एका सहयोगी संघटनेच्या सहकार्याने विकसित केली जात आहेत.  ज्याठिकाणी शक्य असेल त्याठिकाणी उपलब्ध क्षमता आणि सेवांचा वापर करून, त्यामध्ये तेजी आणण्यासाठी सध्याच्या पायाभूत सेवासुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा निर्णय घेतला गेला.  या सर्व सुविधांचे हस्तांतरण १५ जून २०२० पर्यंत प्रयत्न टाटा ट्रस्ट करत आहेत.

प्रत्येक रुग्णालयामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सेवा, छोटी ऑपरेशन थिएटर्स, सामान्य पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, डायलिसिस सुविधा, रक्त साठवणी सुविधा आणि टेलिमेडिसिन युनिट्स अशा क्षमता उपलब्ध करवून देण्यात येतील. या रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी टाटा ट्रस्ट कर्करोग उपचार सुविधा निर्माण करण्यातील आपल्या अनुभवांचा वापर करत आहे तसेच सेवा पुरवठादारांनाही जोडण्यात आले आहे.  बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड करत असून डिझाईन एडिफीस कंसल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. सर्व उपकरणे आघाडीच्या उत्पादकांकडून घेतली जात आहेत.

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी टाटा ट्रस्टकडून हाती घेतला गेलेला हा तिसरा उपक्रम आहे. टाटा ट्रस्टने राज्य सरकारांना आणि वेगवेगळ्या रुग्णालयांना मदत म्हणून व्यक्तिगत सुरक्षा साधने पुरवण्यास आधीच सुरुवात केली आहे.  यामध्ये कव्हरऑल्स, एन९५/केएन९५ मास्क्स, सर्जिकल मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स यांचा समावेश आहे. आजवर जवळपास २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना टाटा ट्रस्ट तर्फे सुरक्षा साधने पुरवली गेली आहेत.

ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने आखून दिलेल्या आरोग्य उपाययोजनांचे पालन केले जावे यासाठी टाटा ट्रस्टने संपूर्ण देशभरात हे विशेष जागरूकता अभियान हाती घेतले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसरतन टाटाटाटामहाराष्ट्रउत्तर प्रदेशहॉस्पिटल