मुंबई: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगात भीतीचं वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यामुळे आफ्रिकेचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जात आहे. मात्र गेल्या २० दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीनं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
१० नोव्हेंबरपासून १ हजार प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत दाखल झाल्याची आकडेवारी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितली. या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या हजार प्रवाशांपैकी किती जण मुंबईत आहेत, किती जण शहराबाहेर गेले, ते कोणाच्या संपर्कात आले, याचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे.
ओमायक्रॉनची लक्षणं काय?आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉ. एँजेलिक कोएत्जी यांनी दिली. डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट शोधून काढला आहे. ओमायक्रॉनची लक्षणं सर्वप्रथम एका ३० वर्षीय तरुणामध्ये आढळून आल्याचं कोएत्जी यांनी सांगितलं. त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. त्याला काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास होता. संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या, अशी माहिती कोएत्जी यांनी दिली.
याआधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घशात खवखव जाणवायची. मात्र ओमायक्रॉनची लागण झालेल्याना ती समस्या जाणवत नाहीए. या रुग्णांना खोकल्याचा त्रास होतोय. पण त्यांच्या तोंडाची चव गेलेली नाही. वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झालेला नाही, असं डॉ. कोएत्जी यांनी सांगितलं. ओमायक्रॉनची लागण झालेल्या सुरुवातीच्या काही रुग्णांमध्ये या समस्या आढळून आल्या. मात्र या व्हेरिएंटची नेमकी लक्षणं जाणून घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांचा अभ्यास गरजेचा असल्याचं कोएत्जी म्हणाल्या. डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्याच्या संपूर्ण कुटुंबालादेखील याच व्हेरिएंटची बाधा झाल्याचं चाचणीतून समोर आलं.