CoronaVirus News: दिलासादायक! गेल्या 24 तासांतील कोरोनाच्या आकडेवारीने राज्याला दिले चांगले संकेत
By मुकेश चव्हाण | Published: December 6, 2020 09:36 PM2020-12-06T21:36:48+5:302020-12-06T21:46:10+5:30
आतापर्यंत एकूण 1723370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 4757 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 80079 पर्यत खाली आला आहे. तसेच आज 7483 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 47 हजार 699 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 1723370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरातील कोरोनाबाबत दिलासादायक बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून 92 टक्क्यांवर स्थिरावलेला कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून अखेर 93.08 टक्क्यांवर पोहचला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 पर्यत खाली आल्याने राज्यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहे.
राज्यात आज 4757 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7486 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1723370 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 80079 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.08% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 6, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 73 हजार 705 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 52 हजार 266 (16.43 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 56 हजार 85 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 5 हजार 903 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra records 4,757 new COVID-19 cases, tally rises to 18,52,266; death toll goes up by 40 to 47,734: Health department
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2020
दरम्यान, दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.