Join us

CoronaVirus News : योगाच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 1:31 AM

योगा, ध्यानधारणेच्या माध्यमातून बीपीटी कोविड आश्रमात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ७० रुग्णांसाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

मुंबई : कोविड रुग्णांची सातत्याने वाढती संख्या पाहून मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने कोविड केअर आश्रम तयार केला आहे. या माध्यमातून रुग्णांवर निसर्गाच्या सान्निध्यात उपचार केले जात आहेत. योगा, ध्यानधारणेच्या माध्यमातून बीपीटी कोविड आश्रमात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ७० रुग्णांसाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे.या ठिकाणी रुग्णाला गरज भासल्यास आॅक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योगा, ध्यानधारणा, सकाळी व संध्याकाळी परिसरात चालण्याची सुविधा, सौरस्नान अशा विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.आणीबाणीच्या परिस्थितीसाठी या आश्रमात आॅक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय थर्मल स्क्रीनिंग व रक्तातील आॅक्सिजनचा पुरवठा तपासण्यासाठी आॅक्सीमीटरदेखील या आश्रमात ठेवण्यात आले आहेत.या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना एका मोठ्या सभागृहात योगा व ध्यानधारणा करण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, त्यांना आॅनलाइन पद्धतीने सूचना, मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याची सोय आहे. येथे दाखल केलेल्या रुग्णाला त्याच्यावर उपचार सुरू आहेत किंवा त्याला कोविड १९ ची लागण झाली आहे याचा पूर्ण विसर पडेल, असे वातावरण तयार करण्यात आले आहे. रुग्णावर कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण येऊ नये याची सर्व काळजी घेऊन तशी परिस्थिती तयार करून नैसर्गिक पद्धतीत कोविडचा सामना यशस्वीपणे करून रुग्ण ‘कोविड’मुक्त होऊन घरी जाईल, अशी पद्धती विकसित केली आहे.>१२० खाटा रुग्णांसाठीमुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने बीपीटी रुग्णालयाचे यापूर्वीच कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. त्या ठिकाणी १२० खाटा कोविड रुग्णांसाठी व स्वतंत्र २५ खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या कोविड रुग्णालयात ६११ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस