Join us

CoronaVirus News : सर्वात आधी लस कोविड योद्ध्यांना देणार, चाचणीला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 3:51 AM

CoronaVirus News: नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देण्यात आलेल्या १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत.

मुंबई : शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावर पीछेहाट करणाऱ्या कोरोनाला मात देण्यासाठी अखेर मुंबईकर सज्ज झाले आहेत. सात महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. या संकटाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लवकरच लसही उपलब्ध होणार आहे.  नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देण्यात आलेल्या १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत.

लस येईल तेव्हा...- वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार.- प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन शिबिर आयोजित करून या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाणार. - लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी दवाखाने, आरोग्य केंद्र यांचे सहकार्य घेणार. 

कोणाला मिळणार लस?शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार अशा कोरोना लढ्यात थेट सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी ज्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.

जिल्हा स्तरावर काय तयारी सुरू आहे?- पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची १६३ स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली आहे.- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मुंबईकराची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. यामध्ये सहव्याधी असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांची नोंद केली आहे.- सर्व कोविड योद्धे, कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रित करून त्यांच्या संपर्क क्रमांकासह सर्व नोंदणी तयार करण्यात आली आहे. 

- १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ऑक्सफर्डच्या या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. 

कोरोना परतीच्या मार्गावरमार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. ‘चेस दि व्हायरस’, ‘फिव्हर क्लिनिक’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशा मोहिमा प्रभावी ठरल्या. त्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १५७ दिवसांवर पोहोचला आहे. 

कोरोना लस जानेवारी २०२१ नंतरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र त्या वेळेस धावाधाव टाळण्यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे. नोंदणी करण्यात आलेल्या सर्वांना संपर्क करून लस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.    - सुरेश काकाणी,     अतिरिक्त महापालिका आयुक्त 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई