CoronaVirus News : ‘वाॅर रूम’! आम्ही जिवंत माणसे, निव्वळ क्रमांक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 07:19 AM2021-04-17T07:19:32+5:302021-04-17T07:21:54+5:30
CoronaVirus News: संबंधित प्रतिनिधी तणावात गेले असून 'आम्ही war रूममधला निव्वळ एक क्रमांक नसून जिवंत माणसे आहोत' असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आता आली आहे.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेने war रूम तयार केले. मात्र अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे नागरिकांना या क्रमांकावर उत्तर देता
संबंधित प्रतिनिधी तणावात गेले असून 'आम्ही war रूममधला निव्वळ एक क्रमांक नसून जिवंत माणसे आहोत' असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आता आली आहे. याप्रकरणी 'लोकमत' प्रतिनिधीने त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मांडलेली व्यथा:
बेडसाठी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
'बेडसाठी विचारणा करायला मला एका महिलेने फोन केला. तेव्हा त्याना मी सर्व माहिती दिली आणि बेडसाठी फोन येईल असेही सांगितले. तेव्हा शिवीगाळ करत त्यांनी फोन ठेवला. ६०० ऍडमिशन आणि निव्वळ १०० लोक डिस्चार्ज झाले तर आम्ही कसे मॅनेज करायचे हा प्रश्न असुन असे प्रकार वरचेवर घडत आहेत. याला आळा बसायलाच हवा.
तज्ज्ञांचे मत काय ?
‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे सेशन घ्या
War रूम मध्ये काम करणाऱ्यांना विविध चौकशीसाठी फोन येतात. सततच्या या ताणाला सामोरे जाण्यासाठी पालिकेच्या मानसोपचार विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना तणावाशी डील कशी करायची याबाबत छोटे छोटे सेशन घेत मार्गदर्शन करावे.
- युसूफ माचीसवाला,
मानसोपचार तज्ज्ञ
दर चार तासांनी ब्रेक घेणे आवश्यक
'वाॅर रूम हे खऱ्या युद्धात असलेल्या एका विभागाप्रमाणे आहे जो फारच संवेदनशील आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करणाऱ्या लोकांनीही त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दर चार तासांनी ब्रेक घेणे आणि त्यावेळी कोणताही स्क्रीन टाइम टाळणे हे आवश्यक आहे.
- अलका सुब्रमण्यम,
मानसोपचार तज्ज्ञ सहायक प्राध्यापक, नायर रुग्णालय
वाॅर रूममधील प्रत्येक काॅल उचला - महापौर किशोरी पेडणेकर
रूममध्ये आलेला प्रत्येक दूरध्वनी हा उचललाच गेला पाहिजे, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर दिले.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेने उपाय योजना आखल्या. दुस-या लाटेत रुग्णांची संख्या घटावी, परिस्थितीवर नियंत्रण मिळावे म्हणून काम केले जात आहे. वॉर रूम आणखी वेगाने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र काही वॉर रूम वगळता काही वॉर रूममधून पुरेशी माहिती मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची आणि रुग्णांची हेळसांड होते आहे. या बाबतचे चित्र लोकमतने रिअॅलिटी चेकद्वारे मांडले होते.
किशोरी पेडणेकर यांनी यावर वॉर रूमबाबत तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी भांडुप येथील एस विभाग कार्यालयाला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. त्या म्हणाल्या की, येथील स्मशानभूमीला गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसला थकीत बिलामुळे गॅस पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन कोरोना काळात गॅसमुळे अंत्यसंस्कार करण्यात अडचण निर्माण होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने भेट दिली.
स्मशानभूमी संचालित करणाऱ्या संबंधित संस्थेला तातडीने देयक अदा करण्याचे निर्देशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दुसरा डोस न घेताच प्रमाणपत्र
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात लसीकरणाचा दुसरा डोज न घेता प्रमाणपत्र प्राप्त होत असल्याची तक्रार प्राप्त होताच किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी लसीकरण केंद्राला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.
महापौरांनी लसीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने लसीचा डोज न घेता प्रमाणपत्र कशा पद्धतीने वितरित झाले याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, डोज न घेता अशा पद्धतीने प्रमाणपत्र वितरित होणे ही चुकीची बाब आहे. संगणकावर संपूर्ण ॲपची प्रक्रिया समजून घेतली असता ही बाब लक्षात येते.
या व्यक्तीने लसीकरणाचा दुसरा डोस घेतला नाही, हे यातून स्पष्ट होते. ही तांत्रिक चूक आहे की नाही ? हे सद्यस्थितीत सांगू शकत नसून यामुळे अनेक जण लसीकरणाच्या दुसरा डोज पासून वंचित राहू नये.
अशा प्रकारे ॲपद्वारे प्रमाणपत्र प्राप्त होणे ही गंभीर बाब असून याबाबत संबंधित वैद्यकीय अधीक्षकांनी महापालिका आयुक्तांना लेखी कळवावे, असे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.