Join us

CoronaVirus News : धारावी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर, रुग्णांची सरासरी दैनंदिन वाढ १.१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 7:24 AM

एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर धारावीमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. अडीच चौरस किलोमीटर जागेत वसलेल्या साडेआठ लाख लोकवस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे एक मोठे आव्हान होते.

मुंबई : रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात आणल्यानंतर मिशन धारावीद्वारे महापालिकेने आणखी एक मोहीम यशस्वी केली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता केवळ ९९ सक्रिय रुग्ण आहेत. येथील २०८० रुग्ण कोरोनाशी यशस्वी झुंज देत घरी परतले आहेत.एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर धारावीमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. अडीच चौरस किलोमीटर जागेत वसलेल्या साडेआठ लाख लोकवस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे एक मोठे आव्हान होते. मात्र मुंबईपुढे धारावीच्या रूपाने उभे राहिलेल्या संकटाला फिव्हर क्लिनिक, मिशन धारावी, चेसिंग द वायरस अशा मोहिमेतून महापालिकेने तोंड दिले. यामुळे आता धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची सरासरी दैनंदिन वाढ १.१ टक्के आहे.जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार, त्वरित डिस्चार्ज या धारावीच्या मूलमंत्राचे कौतुक आता जागतिक पातळीवर केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धारावीचे कौतुक केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही धारावीच्या कार्याची दखल घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी धारावीत १३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २४२८ रुग्णांची नोंद झाली असून २०८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.दादर, माहीममध्ये रुग्ण वाढलेआता धारावीच्या तुलनेत दादर आणि माहीममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दादरमध्ये सध्या १२१६ रुग्ण असून त्यापैकी ८५३ रुण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३९२ सक्रिय रुग्ण आहेत. माहीमध्ये आतापर्यंत १४४६ रुग्ण सापडले असून त्यापैकी ११२२ कोरोनामुक्त झाले असून २५६ सक्रिय रुग्ण आहेत.म्हणूनच कोरोनाला अटकाव करण्यात यशबाधित क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांची चाचणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ लोकांचे विलगीकरण, लेबर कॅम्पद्वारे लोकांच्या घरी जाऊन त्यांना तपासणे, संस्थात्मक विलगीकरण व तातडीने कोरोना केंद्र उभारणे अशा आवश्यक सुविधा उभ्या करून धारावीने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस