CoronaVirus News: मंदिरं उघडू, पण दिवाळीनंतर;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:14 AM2020-11-09T01:14:08+5:302020-11-09T07:01:51+5:30
टीका करणारे जबाबदारी घेणार का?
मुंबई : दिवाळी आणि त्यानंतरचे पंधरा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काळजी घेतली नाही तर कोरोनाची तिसरी लाट नव्हे, त्सुनामी येऊ शकते. सावधगिरी बाळगा, असे आवाहन करत; ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला नाही. दिवाळीनंतर एक नियामवली तयार करून मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे उघडली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मेट्रो प्रकल्प, दिवाळीतील फटाके बंदी, कोरोना आणि मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले. मंदिरांबाबत ते म्हणाले, मंदिरं न उघडण्यावरून सध्या माझ्यावर टीका होतेय. होऊ द्या. जनतेच्या भल्यासाठी मी टीका सहन करायला तयार आहे.
वाईट म्हणणारे चार दिवस बोलत राहतील. पण उद्या काही निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले तर हेच टीकाकार जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणार नाहीत. उलट, तुमचे तुम्ही बघा, आम्ही तर बोललोच होतो, असे सांगून मोकळी होतील. म्हणून सावधपणे पावले टाकली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंदिरांमध्ये घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक जात असतात. त्यांना आतापर्यंत आपण जपत आलो आहोत. मंदिर, मशीद, चर्चमध्ये आपण खेटून खेटून प्रार्थना करत असतो. त्यामुळे तिथे एखादा कोरोनाबाधित व्यक्ती आला तर ते जास्त महागात पडेल. त्यामुळे धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मला आणीबाणी लादायची नाही
मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, असा प्रश्न करतानाच सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलं बदनामीचं कारस्थान
महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी बदनामीची मोहीम चालवली. इथे स्थिती हाताबाहेर गेल्याचा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रद्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. इतक्या बदनामीनंतरही उद्योग क्षेत्रात राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. जूनमध्ये १७ हजार तर आता तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. कोट्यवधींचे हे करार केवळ कागदावरचे नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. माझ्यावर टीका झाली की, मातोश्रीच्या बाहेर पडलो नाही. पण, मी घरी बसून ही कामे केली आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
विकास प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकू नका
मेट्रो कारशेड कांजूरमार्गला उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर होत असलेल्या टीकेचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.
ही जमीन मिठागराची आहे, असे म्हणणारेच मुंबईकरांच्या प्रकल्पात मिठाचा खडा टाकत आहेत. याचा काय इलाज करायचा तो करू. जे मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता कोणत्याही परिस्थिती करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई-ठाणे प्रवास गतिमान होण्यासाठी मेट्रो मार्गिकेसाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून ४५ दशलक्ष युरोचे कर्ज माफक व्याजदरात घेण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करतांना खूप आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर लतादीदींचे आवाहन
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधताना जे सांगितलं, त्याची अंमलबाजवणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीत कमीत कमी फटाके फोडा. प्रदूषणाला आळा घाला, प्रकाशाचे पर्व साजरं करा. दिवाळी साजरी करा. मास्क आवश्यक लावा, स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या,’ असे आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरवर केलं आहे