CoronaVirus News : मृत्युदरावरील नियंत्रणासाठी दर आठवड्याला रुग्णालयांचे ऑडिट, टास्क फाेर्समधील तज्ज्ञांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:37 AM2020-11-06T02:37:07+5:302020-11-06T02:39:10+5:30
CoronaVirus News: राज्य शासनाच्या आऱोग्य विभागातील तज्ज्ञ आणि पालिका रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत रुग्णालय ऑडिटविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला.
मुंबई : मुंबईतील मृत्युदरावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून विश्लेषण सुरू आहे. यात शहर, उपनगरातील रुग्णालयांचे दर आठवड्याला ऑडिट होणार असून याद्वारे मृत्युदर कमी कऱण्यासाठीच्या उपाययोजना आखण्यात येतील, अशी माहिती टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
राज्य शासनाच्या आऱोग्य विभागातील तज्ज्ञ आणि पालिका रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत रुग्णालय ऑडिटविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. याविषयी, टास्क फोर्समधील डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, शहर, उपनगरातील मृत्युदर न स्थिरावण्याची कारणे यावेळी मांडण्यात आली. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाच्या नियमांचे पालन होते का, याचीही तपासणी हाेईल. जूनच्या मध्यानंतर गेल्या रविवारी मुंबईचा मृत्युदर ३.९ टक्क्यांवर आला. मात्र ताे राज्याच्या तुलनेत अधिक आहे. राज्याचा मृत्युदर २.६ टक्के असून देशाचा १.५ टक्के आहे.
नेमक्या कारणांचा करणार अभ्यास
मुंबईत अजूनही मृत्युदर घसरलेला नाही. सप्टेंबरमध्ये ताे १.९ ते २.३ टक्क्यांवर आला होता, मात्र आक्टोबरमध्ये पुन्हा वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे २.८ ते ३ टक्क्यांवर आला. मुंबईच्या मृत्यूविश्लेषण समितीचे सदस्य आणि केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, सप्टेंबरमधील रुग्णवाढीमुळे मृत्युदर वाढला. पुणे, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांच्या तुलनेत मुंबईतील मृत्युदराचे प्रमाण अधिक का आहे, यामागच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करण्यात येत आहे.