मुंबई : सायन रुग्णालयात ज्या पद्धतीने मृतदेह हाताळण्यात आले त्यावर चिंता व्यक्त करीत उच्च न्यायालयाने ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, असे म्हटले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह कशा प्रकारे हाताळण्यात येतो आणि त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी राज्य सरकार व मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले. सायन रुग्णालयात कोरोनाच रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोनाच रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हीडिओ शूट करण्यात आले होते. याबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अॅड. राजेंद्र पै यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ज्या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येतात त्या वॉर्डमध्ये मृतदेह न ठेवण्याचे निर्देश महापालिका व राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी जमहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.सायनमधील प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली? अशी चौकशी न्यायालयाने करताच पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी याचा तपास सुरू आहे, अशी माहिती न्यायलयाला दिली.न्यायलयाने म्हटले की, याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आलेला मुद्दा गंभीर आहे. कोरोना पीडितांच्या मृतदेहांचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे या याचिकेची व्याप्ती राज्यातील सर्व महापालिकांसाठी लागू करण्यात येत आहे, असे म्हणत महाअधिवक्ता यांना याबाबत १ जुलै रोजी उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले.>सायन रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हीडिओ शूट करण्यात आले होते.
CoronaVirus News: मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया काय?, सायन रुग्णालयाला कोर्टाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:09 AM