CoronaVirus News : माणसं मरुन पडतील तेव्हा जाग येणार का...?, काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:57 AM2021-04-11T03:57:33+5:302021-04-11T07:08:55+5:30
CoronaVirus News : होम क्वारंटाईनचा सल्ला दिला तरी तो धुडकावून बाहेर फिरत आहेत. ज्यांनी स्वतःचे स्वॅब तपासायला दिले, असे लोक रिपोर्टची वाट न पाहता लोकांमध्ये मिसळत आहेत.
मुंबई : एका अधिकाऱ्याकडे काम करणारी मुलगी. होळीनिमित्त गावी गेली. गावात तिला ताप आला. तिथल्या स्थानिक डॉक्टर कडून तिने औषध घेतले. मुंबईत परत कामाला आली. अधिकाऱ्याला तिने गावी काय झाले हे सांगितले नाही. मुंबईत आल्यानंतर ताप वाढला.
डॉक्टरांनी औषधं दिली. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. अशा परिस्थितीत देखील ती मुलगी गावाकडच्या डॉक्टरने दिलेली आणि मुंबईतल्या डॉक्टरने दिलेली औषधे घेत होती. कारण गावाकडे काय झालं हे जर इथे सांगितलं तर आपल्याला कामावरून काढून टाकतील अशी भीती तिच्या मनात होती. हे एक उदाहरण झाले. अशी असंख्य उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. लोक लक्षण लपवत आहेत.
होम क्वारंटाईनचा सल्ला दिला तरी तो धुडकावून बाहेर फिरत आहेत. ज्यांनी स्वतःचे स्वॅब तपासायला दिले, असे लोक रिपोर्टची वाट न पाहता लोकांमध्ये मिसळत आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना आपण आजारी पडलो तर खाणार काय? घरच्यांना कोण खायला देणार?
या विवंचना आहेत. त्यातून ते देखील आजार लपवत दिवस काढत आहेत.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यात जमा आहे
मुंबई महापालिकेतून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना ऍडमिट करून घेण्यासाठी फोन येत असे.
लस घेऊन येणाऱ्यांना आपण लस घेतली का, आपल्याला त्रास आहे का? अशी विचारणा व्हायची. मात्र गेल्या काही दिवसापासून तसे फोन येणे बंद झाले आहेत. ९० हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत, त्यात रोज १० हजारांची भर पडत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यात जमा आहे.
बेफिकिरी..
काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी आज राज्याच्याच नाही तर देशाच्या मुळावर आली आहे.