Join us

CoronaVirus News: दिलासा! मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट; राज्यात रुग्णवाढीचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 6:28 AM

मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक ...

मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १३ हजार १६१ झाला आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट झाल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.७८ टक्के एवढा खाली आला आहे, तर ८७ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

आतापर्यंत मुंबईत सहा लाख ४८ हजार ६२४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पाच लाख ७२ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच १३ हजार १६१ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या ६१ हजार ४३३ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ८९ रुग्णांपैकी ४२ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये ५६ पुरुष, तर ३३ महिला रुग्णांचा समावेश होता. ५४ मृत रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर ३२ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. ४० वर्षांखालील तीन रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४३ हजार ५२५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ५४ लाख २३ हजार ९९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्णवाढीचा आलेख चढाच

राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी नव्या बाधितांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. रोजच्या नव्या बाधितांचे प्रमाण ६० हजारांच्या घरात आहे. शुक्रवारी दिवसभरात ६२ हजार ९१९ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांची संख्या ८२८ इतकी आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४६ लाख २ हजार ४७२ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ३८ लाख ६८ हजार ९७६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यभरातील अँक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ६२ हजार ६४० इतकी आहे. आजच्या ८२८ करोना बाधितांच्या मृत्यूने बळी पडलेल्यांची एकुण संख्या ६८ हजार ८१३ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७१ लाख ६ हजार २८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६ लाख २ हजार ४७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ९३ हजार ६८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई