मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वांद्रे येथील निवासस्थान असणाऱ्या 'मातोश्री' बाहेरील चहावाल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. मात्र आता मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'मिडडे' या वृत्तपत्रानूसार, मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याचा थेट संपर्कात आलेलं नाही, असं सांगण्यात येत आहे. मात्र ठाकरे कुटुंबीयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
याआधी मातोश्री'च्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असणाऱ्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिवसागणिक वाढत चालला असून, राज्य सरकारही सतर्कतेचे उपाय योजत आहे. राज्यात बुधवारी १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.