CoronaVirus News: कोरोना चाचण्यात राजधानी दिल्ली अव्वल, तर मुंबईत प्रमाण कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:00 AM2020-07-25T02:00:28+5:302020-07-25T06:40:42+5:30
तपासण्या वाढवा, तरच मात करता येईल; आयसीएमआरचे निर्देश
- अतुल कुलकर्णी
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीत रोज १५,२१८ चाचण्या होत आहेत, तर मुंबईत मात्र फक्त ५५७९ चाचण्या होत आहेत. मुंबईने चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, असे निर्देश आयसीएमआर दिले आहेत.
दिल्लीचा मृत्यूदर ६.४ टक्क्यांवरून २ टक्क्यावर आला आहे, तर मुंबईतील मृत्यूदर सुरुवातीला ६ ते ८ टक्के होता. आता ४ ते ६ टक्क्याच्या दरम्यान आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबईचा मृत्यूदर अधिक असून ही चिंताजनक बाब असल्याने तज्ज्ञांचे मत आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर काही दिवस रुग्णसंख्या वाढेल पण नंतर ती कमी होईल हे दिल्लीत दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्टÑाते चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, आयसीएमआरने कळवले आहे.
मुंबईत रोज साडेपाच ते सहा हजारच चाचण्या होत आहेत. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण २० टक्क्याच्या खाली येण्यास तयार नाही. पुण्यात सुध्दा ७ ते साडेसात हजार चाचण्या होत आहेत. १ जुलै ते २२ जुलै कालावधीत मुंबईत आतापर्यंत १ लाख २२ हजार ७५९ तर नवी दिल्लीत ३ लाख १९ हजार ५५९ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत दरदिवशी ५ हजार ५७९ तर दिल्लीत १५ हजार २१८ चाचण्या होतात.
कोणत्या ठिकाणी किती तपासण्या झाल्या?
तारीख मुंबई पुणे दिल्ली
(२ जिल्हे) (जिल्हा)
१७ जुलै ६०३३ १०,६८० २०,४६४
१८ जुलै ५८४९ १०,८८३ २१,८५२
१९ जुलै ५०३४ १०,११० २०,२०६
२० जुलै ४८२२ ११,७०५ ११,४७०
२१ जुलै ७३७६ १३,८३८ २०,८५२
२२ जुलै ६०५२ १३,९१६ २०,०६०
मृत्यूदर
तारीख मुंबई महाराष्ट्र दिल्ली
(२ जिल्हे)
१७ जुलै ५.११ ३.११ १.७८
१८ जुलै ५.४८ १.७२ १.७६
१९ जुलै ६.१७ २.७१ २.४६
२० जुलै ३.९६ २.१४ ३.६०
२१ जुलै ६.५६ २.९५ २.०
एकूण चाचण्यांपैकी बाधित
रुग्णांचे प्रमाण (इन्फेक्शन रेट)
तारीख मुंबई महाराष्ट्र दिल्ली
(२ जिल्हे)
१७ जुलै २०.१२ २१.७२ ७.१४
१८ जुलै २०.२८ २२.०१ ६.८१
१९ जुलै २०.६२ २२.९० ५.९९
२० जुलै २१.४६ २२.५५ ८.३२
२१ जुलै १२.८१ २०.८५ ६.४७
२२ जुलै २१.६५ २२.७१ ६.१२
मुंबईत रोज किमान १५ ते २० हजार चाचण्या केल्या पाहिजेत. आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे आपला इन्फेक्शन रेट ५ ते १० टक्क्याच्या आत आणला पाहिजे. जर असे झाले नाही तर आज दर १०० लोकांमागे बाधित होणारे २० ते २२ लोक किती जणांंना बाधित करतील आणि त्यातून किती मृत्यू होतील हे सांगणे देखील भयावह आहे. हा कोणाच्या प्रतिष्ठेचा किंवा कौतुकाचा विषय नसून मुंबई वाचवण्याचा आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते
आम्ही चाचण्यांसाठी कोणतीही अट ठेवलेली नाही. ज्यांना आवश्यक आहे त्यांचीच चाचणी केली जात आहे. शिवाय आम्ही आजपासूनच अॅन्टीजेन टेस्टींगची मोहीम हाती घेतली आहे. ज्यांना कोणाला लक्षणे वाटतात ते कोठेही जाऊन तपासणी करु शकतात. बेडची व्यवस्था देखील आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई मनपा