CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:50 AM2020-06-10T09:50:12+5:302020-06-10T09:52:30+5:30

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी अधिकृत औषधांचा शोध देखील अजूनपर्यत लागलेला नाही

CoronaVirus News:The state government has issued guidelines for people with corona symptoms | CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

googlenewsNext

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे.  राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी अधिकृत औषधांचा शोध देखील अजूनपर्यत लागलेला नाही. मात्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोरोनावर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.  

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय

१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोरोना लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.  
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी

१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोरोनासारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे      
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी

१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.  

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ  आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी  डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोरोना पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.  
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी

१.कोरोना समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.


 

Web Title: CoronaVirus News:The state government has issued guidelines for people with corona symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.