मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानं अनेक ज्येष्ठांना अडचणींचा सामना करावा लागतोय. बाहेर पडल्यास कोरोना संसर्गाचा धोका असल्यानं ज्येष्ठ नागरिक घरात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू कोण आणून देणार, असा प्रश्न एकटं राहणाऱ्या ज्येष्ठांसमोर आहे. त्यांच्या मदतीला अनेक जण धावून गेले आहेत. काही संस्था अशा ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थितीतही मुंबई स्पिरीट पाहायला मिळत आहे.मुंबईतील काही स्वयंसेवी संस्थांनी वृद्धांच्या घरी जाऊन त्यांना अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. राऊंड टेबल इंडियाच्या सदस्यांनी मुंबईची विविध भागांमध्ये विभागणी केली असून समाज माध्यमांमध्ये याबद्दल जागरुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवण तयार करण्याचं कामही संघटनेचे २०० सदस्य करत आहेत. राऊंड टेबल इंडियाला परदेशातील काही जणांचे फोनदेखील येत आहेत. परदेशात राहणाऱ्या अनेकांचे पालक मुंबईत आहेत. ते एकटे असल्यानं त्यांच्या मदतीसाठी मुंबईत कोणीही नाही. त्यामुळे आमच्या पालकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवा, अशी विनंती परदेशातील मुलं करत आहेत. मुंबईच्या विविध भागांकडून येणाऱ्या फोन कॉल्सवरील माहिती घेऊन त्यांचा तपशील संबंधित विभागातल्या सदस्यांकडे पाठवला जात आहे.
CoronaVirus: कोरोना संकटातही मुंबई स्पिरीट कायम; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचे हात सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:39 PM