Coronavirus: ... म्हणून मुख्यमंत्र्यांकडून गडकरींचे कौतुक, नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 01:51 PM2020-04-26T13:51:30+5:302020-04-26T13:51:43+5:30
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे,
मुंबई - राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य असून यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. त्यानंतर आज रविवारी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, सर्वप्रथम अक्षय तृतीया, रमजान आणि महात्म बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांनी आपले सण-उत्सव घरात साजरे करुन मानवतेचा धर्म जपला, याबद्दल उद्धव ठाकरेंनी सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले.
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढतो आहे. मात्र, काही जणांकडून राजकारण केलं जात आहे. मी या फंद्यात पडत नाही, सध्या कोरोनाच्या लढाईत लढायचं हे माझं प्राधान्यानं काम आहे. पण, मला अनेकांकडून तसं सांगण्यात येतंय. जर, तसं घडत असेल तर मला आवर्जून केंद्रीयमंत्र नितीन गडकरी यांचं आभार मानायचं आहे. नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद... असे म्हणत मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी नितीन गडकरींना धन्यवाद दिले.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण करणाऱ्या काहींना नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिलाय. ही वेळ राजकारण करायची नाही, हे नितीनजींनी सांगितलंय. त्यामुळे मला त्यांचे आभार मानावे वाटतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सल्ला दिला होता. कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.