CoronaVirus News: शूटिंगसाठी ज्येष्ठांना नो एंट्री, बच्चे कंपनीला परवानगी कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:36 AM2020-06-19T03:36:39+5:302020-06-19T03:41:33+5:30

चित्रपट, टीव्ही या क्षेत्राशी संबंधित लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळेच मालिका चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे.

CoronaVirus No entry for elderly artist but childrens allowed for tv serial movie shoot | CoronaVirus News: शूटिंगसाठी ज्येष्ठांना नो एंट्री, बच्चे कंपनीला परवानगी कशी?

CoronaVirus News: शूटिंगसाठी ज्येष्ठांना नो एंट्री, बच्चे कंपनीला परवानगी कशी?

Next

- सुवर्णा जैन

मुंबई : मुंबईसह राज्यात आणि देशभरात कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक नियम शिथिल झाले आहेत. कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

चित्रपट, टीव्ही या क्षेत्राशी संबंधित लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळेच मालिका चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील कलाकारांना शूटिंग करता येणार नाही. शूटिंग लोकेशनवर या कलाकारांना येता येणार नाही असे आदेश आहेत. ‘गुड्डन तुमसे’, ‘ना हो पायेगा’, ‘तुमसे ही राबता’, ‘कुमकुम’, ‘भाग्य’, ‘कुंडली’, ‘कुरबान हुआ’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेम, पॉइजन पंगा’ आणि ‘सारेगामा लिटील चॅम्प’ या मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.

मात्र एकीकडे ६० वर्षांवरील कलाकारांना बंदी असताना लहान मुलांना सेटवर परवानगी कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला निमित्त ठरले आहे ‘सारेगामा लिटील चॅम्प’. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये लहान मुलांनी शूटिंगस्थळी येणे कितपत योग्य आहे?, कार्यक्रमासाठी त्यांचा जीव धोक्यात का घालायचा असे सवाल यामुळे निर्माण झाले आहेत.

लहान मुलांना परवानगी देणे अयोग्य : स्पृहा जोशी
अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्याशी लोकमतने संवाद साधला असता तिने सांगितले की, या निर्णयाचा तिने जाहीर निषेध केला आहे. लहान मुलांना शूटिंग करण्यास परवानगी देणे योग्य नाही. त्यांच्या जीवाशी हा खेळच आहे. म्युझिक शो असल्यामुळे गाण्यासाठी त्यांना माईकची गरज लागणार. अशावेळी सगळीकडे त्यांना हात लावावा लागणार. सगळ्या गोष्टींमागे बराच विचार झालेला असतो. मला मुल असते तर मी नसते पाठवले असेही ती म्हणाली. गाणे म्हटल्यावर सगळे माईक्स येतात. ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचे योग्यरितीने पालन होणार आहे का? असा सवाल तिने उपस्थित केला. लिटील चॅम्प्सबाबत थोडे विचित्रच वाटते. ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात जास्त धोका असतो. अशावेळी मुलांना शूटिंगसाठी पाठवणे नक्कीच रिस्क आहे, असे ती म्हणाली.

पालकांनी निर्णय घ्यावा : जितेंद्र जोशी
कोणत्याही मुद्यावर थेट आणि परखड मत मांडणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशी याने सांगितले की, कोरोनाच्या गंभीर स्थितीतही मुलांना लिटील चॅम्पसारख्या कार्यक्रमांमध्ये पाठवायचे की नाही हा निर्णय त्यांच्या पालकांनी घ्यावा, असे तो म्हणाला. कार्यक्रम सुरू करणारे करतील, मात्र पाठवणाऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. या परिस्थितीत मुलीला शाळेतही पाठवणार नाही, असे त्याने सांगितले.

Web Title: CoronaVirus No entry for elderly artist but childrens allowed for tv serial movie shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.