CoronaVirus: दिलासादायक! प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या वरळीत नवा रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:04 AM2020-04-24T03:04:17+5:302020-04-24T03:04:31+5:30
जी दक्षिण विभागातील नऊ ठिकाणी रुग्णवाढ थांबली
मुंबई : मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शहर, उपनगरात पहिल्यांदा वरळीचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला. हॉटस्पॉट ठरल्यामुळे या परिसराला पोलीसांनी वेढा घातला, घरोघरी जाऊन तपासण्या केल्या. मात्र आता मुंबईतील वरळी परिसराविषयी दिलासा देणारी बाब म्हणजे मागील १० दिवसांत येथील प्रतिंबंधित क्षेत्रातील नऊ ठिकाणी एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे परिसरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणांना यश मिळत असल्याचे दिसून येते आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जी दक्षिण विभागातील नऊ ठिकाणी गेल्या दहा दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ही ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रातून वगळली आहेत. जी दक्षिण विभागातील वरळी आणि प्रभादेवी हा परिसर कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. येथील अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे साहजिकच येथील रहिवाशांवर लॉकडाउनपेक्षाही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने यातील नऊ ठिकाणांवरचे अतिरिक्त निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील वगळण्यात आलेल्यांमध्ये आदर्श नगर, सिद्धी प्रभा बिल्डिंग, वरळी पोलीस कॅम्प, साती आसरा, उत्कर्ष बिल्डिंग, बीडीडी चाळ, लोढा वर्ल्ड वन, आनंदछाया बिल्डिंग आणि आहुजा बिल्डिंगचा समावेश आहे. या नऊ झोनमध्ये सुमारे चार हजार लोकांची वस्ती असून तिथे ४८ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. मोठ्या प्रतिबंधित क्षेत्रांपैकी असलेले वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आणि जनता कॉलनीत यापुढेही निर्बंध कायम राहणार आहेत. रहिवाशांच्या अनावश्यक वावरावर कठोर निर्बंध आणल्यास व सोशल डिस्टन्सिंगचे नियम व्यवस्थित पाळल्यास 'कोविड १९'ची साखळी तोडता येते हेच यावरून स्पष्ट झाले आहे. जी दक्षिणमधील इतर ३६ व शहरातील ७२१ कंटेनमेंट झोनमध्येही हीच पद्धत यशस्वीरित्या राबवता येऊ शकते.
निर्बंधातून वगळण्यात आलेले विभाग
आदर्श नगर, सिद्धी प्रभा बिल्डिंग, वरळी पोलीस कॅम्प, साती आसरा, उत्कर्ष बिल्डिंंग, बीडीडी चाळ, लोढा वर्ल्ड वन, आनंदछाया बिल्डिंग आणि आहुजा बिल्डिंंग
येथील निर्बंध कायम
वरळीतील काही भाग निर्बंधातून वगळण्यात आला असला तरी वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आणि जनता कॉलनी या परिसरातील निर्बंध कायम राहणार आहेत.