Join us

Coronavirus: कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, गडकरींनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 7:46 AM

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे

मुंबई - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि कामाच्या पद्धतीमुळे देशभर चर्चिले जातात. अनेकदा आपल्याच पक्षातील चुकांवरही त्यांनी बोट ठेवल्याचं महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं आहे. त्यामुळेच, सर्वच राजकीय पक्षात त्यांच्या मताला मोठी किंमत आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने नितीन गडकरी हेही घरातून आपलं कामकाज पाहात आहेत. तसेच, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं शक्य ते योगदान देत आहेत. त्यातच, बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कानही टोचले. 

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना  दिला आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे', असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांचे कान टोचले आहेत. कोरोनाचे संकट टळल्यानंतर राजकारण करा, ही राजकारण करण्याची वेळ नाही, असेही गडकरी यांनी म्हटले. दरम्यान, यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात कुणीही राजकारण करु, मला यात राजकारण करायचं नाही, असे म्हणत कोरोनाचे संकट एकजुटीने लढण्याचा सल्ला दिला आहे. 

दरम्यान, ‘कोरोना’मुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योजकांनादेखील फटका बसतो आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्रात सुमारे ११ कोटी कामगार काम करतात. अनेक कामगार गावांकडे परतले आहेत. ही बाब लक्षात ठेवता देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे गडकरी यांनी यापूर्वीच सांगितले होते. ‘पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री’च्या प्रतिनिधींसमवेत त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला.

 

टॅग्स :नितीन गडकरीकोरोना वायरस बातम्याराजकारणउद्धव ठाकरे