Coronavirus: मुंबई महापालिकेचा अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:46 PM2020-06-17T14:46:32+5:302020-06-17T14:52:46+5:30
मुंबई महापालिकेच्या आदेशावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरुच आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत, मुंबईतील कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजारांच्या वर पोहचला आहे. शहरातील मृतांच्या आकड्यात फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाने महापालिकेवर केला होता.
त्यानंतर आता मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून चाचणी केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिली आहे. यामध्ये एखाद्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर ते रुग्णाला न कळवता थेट महापालिकेला कळवा असा अजब फतवा काढण्यात आला आहे. यावर मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे.
याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, मुंबई महापालिका आयुक्तांचा हा आदेश वाचल्यानंतर मनात काही शंका आल्या आहेत. स्वत:चा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता? त्याचसोबत महानगरपालिकेच्या एकूण कामाची पद्धत पाहता त्या पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंकाही मनसेने उपस्थित केली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाने १५ जूनपर्यंत ४१२८ मृत्यू झालेले असताना राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रत्यक्षात आणखी १३२८ मृत्यू झाले असल्याचे समोर आलं. त्यामुळे कालपर्यंत मृतांचा आकडा ५४५६ झाला आहे. त्यानंतर, कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्य सरकारने फेरतपासणी केली असता मुंबई महापालिका क्षेत्रात आणखी ८६२ मृत्यू, तर राज्यात आणखी ४६६ मृत्यू आढळले. या सर्व प्रकरणांत मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती
...अन् त्याचदिवशी चीनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा ७,६०० कोटींचा करार
शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी
खोदकामात २ युवकांना सापडला ८०० वर्ष जुना खजिना; बाजारात विकायला गेले अन्....