Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:10 PM2021-07-12T23:10:48+5:302021-07-12T23:11:33+5:30

TP100 Mask News: बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क येत आहेत. त्यातच आता चक्क बॅटरीवर चालणारा मास्क बाजारात आला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव असून, कोरोनापासून बचावामध्ये तो उपयुक्त असल्याचा दावा या मास्कच्या निर्मात्यांनी केला आहे.

Coronavirus: Now a battery-powered TP100 Mask will protect against coronavirus. | Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत 

Coronavirus: आता बॅटरीवर चालणारा मास्क कोरोनापासून रक्षण करणार, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत 

Next

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी पुढच्या काही काळात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोरोनापासून बचावासाठी लस आणि मास्क हा सर्वात उपयुक्त पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मास्कची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क येत आहेत. त्यातच आता चक्क बॅटरीवर चालणारा मास्क बाजारात आला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव असून, कोरोनापासून बचावामध्ये तो उपयुक्त असल्याचा दावा या मास्कच्या निर्मात्यांनी केला आहे. (Now a battery-powered TP100 Mask will protect against coronavirus)

मुंबईतील विलेपार्लेस्थित नसरी मोनजी स्कूल ऑफ सायन्सने हा मास्क विकसित केला आहे. 'TP100' असे या मास्कचे नाव आहे. या मास्कचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा मास्क बॅटरीवर चालतो. या मास्कमध्ये कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरून या मास्कच्या संपर्कात येणारा विषाणू हा नष्ट होतो, असा दावा करण्यात येत आहे.

या मास्कबाबत माहिती देताना डॉक्टर वृषाली पाटील यांनी सांगितले की, या मास्कचे नाव टीपी १०० आहे. याचा अर्थ टोटल प्रोटेक्शन १०० असा आहे. हा मास्क विकसित करण्याची कल्पना ही डॉ. नितीन देसाई यांची आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मास्क विकसित केला आहे. या मास्कला दोन कव्हर असून त्यांच्यामध्ये एक चेन आहे. दोन्ही कव्हरांच्या आतमध्ये एक फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमध्ये एक कॉपर कव्हर आणि एक छोटी बॅटरी लावण्यात आली आहे. तसेच त्याला चालू बंद करण्यासाठी एक बटण देण्यात आले आहे. त्यामाध्यमातून फिल्टरमध्ये अल्पविद्युतप्रवाह प्रवाहित करण्याची व्यवस्था असून, या विद्युतप्रवाहामुळे जीवाणू तसेच विषाणू नष्ट करण्यात येतात. 

या मास्कमधील फिल्टरमध्ये प्रवाहित होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे त्वचेला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. या मास्कची प्रायोगिक चाचणी करण्यात आली आहे. काही स्वयंसेवकांच्या माध्यमातून याची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये या मास्कवर फिरून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे विषाणू दिसून आले नाही. तर सामान्य मास्कवर बाहेरून आल्यानंतर बऱ्यापैकी विषाणूंचे जाळे दिसून आले. त्यामुळे हा मास्क हा पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच या मास्कची बॅटरी सुमारे सहा महिन्यांपर्यंत चालू शकते, अशी माहितीही वृषाली पाटील यांनी दिली.

या मास्कचे उत्पादन करण्याचे अधिकार एका फार्मा कंपनीला देण्यात आले आहे. हा मास्क लवकरच सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या मास्कची किंमत ही ८०० ते १००० हजार रुपयांपर्यंत असेल अशी माहिती त्यांनी दिली.  

Web Title: Coronavirus: Now a battery-powered TP100 Mask will protect against coronavirus.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.