राज्यातील दारुची दुकानं उघडू शकतात, फक्त एका अटीवर; राजेश टोपेंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:16 PM2020-04-20T23:16:04+5:302020-04-21T07:48:28+5:30
आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दारूची दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. दारूची दुकाने बंद असल्याने मद्यपींची गैरसोय झाली आहे. दरम्यान, राज्यातील मद्याची दुकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरू करण्यात येतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जर सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन होणार असेल तर दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' मात्र ही दुकाने कधीपासून सुरू होतील, याबाबत आरोग्यमंत्र्यानी माहिती दिली नाही. यासंदर्भातील वृत्त मनीकंट्रोल.कॉमने दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.