मुंबई : कोविडमुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना आरोग्य विषयक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांसाठी काही दिवसांपूर्वी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाने पोस्ट कोविड ओपीडी विभाग सुरू केला होता, आता मात्र शहर उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयानेही यासाठी पुढाकार घेतला आहे.आता नायर आणि केईएम रुग्णालयाही पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. बरे झालेल्या रुग्णांना काही दिवसानंतर पुन्हा एकदा अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. याविषयी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, अशा काही रुग्णांना रुग्णालयात उपचार दिले आहेत. मात्र अशा रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या आठवड्यात हा विभाग कार्यान्वित होईल.मुख्यत: यातील अनेक रुग्णांना अतिजोखमीचे आजार असल्याचे आढळले आहे. तर नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, नायर रुग्णालयात आतापर्यंत ३ हजारांहून अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. देशातील नायर हे संपूर्ण कोविड झालेले पहिले रुग्णालय आहे, आता कोविडमुक्त झालेल्या रुग्णांसाठीही रुग्णालय प्रशासनाने उपयुक्त पाऊल उचलले असून या रुग्णांसाठी शनिवारी पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येणार आहे.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काही दिवसानंतर पुन्हा एकदा अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास उद्भवत असल्याचे दिसून आले आहे.
CoronaVirus News: नायर, केईएममध्ये आता पोस्ट कोविड ओपीडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:55 AM