मुंबई : मुंबईत शनिवारी २८१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ५ हजार ४९ झाली आहे. तर दिवसभरात मुंबईत १३ मृत्यू झाले असून मृत्यूंचा आकडा १९१ इतका झाला आहे. तसेच, धारावीच्या रुग्णसंख्येनेही २०० चा टप्पा ओलांडल्याने शहरातील कोरोनाची स्थिती गंभीर होते आहे. त्यामुळे येत्या काळात यंत्रणांसमोर कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान गडद झाले आहे.
मुंबईत २२ एप्रिल रोजी प्रयोगशाळांमध्ये झालेल्या ७८ कोरोना (कोविड-१९) चाचणी अहवाल शनिवारी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा अंतर्भाव अहवालात केला आहे. मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या १३ मृत्यूंपैकी ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील १० रुग्ण पुरुष व तीन महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० वर्षाखालील होते. तर उर्वरित रुग्ण ४० ते ७० वर्षादरम्यान होते.
शनिवारी पालिकेच्या विविध रुग्णालयांत ३५७ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. तर आजपर्यंत ७ हजार ९६३ रुग्ण भरती झाले आहेत. तर शनिवारी १६७ कोरोना रुग्ण बरे झाले तर आजमितीस ७६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
(CoronaVirus : बेहरामपाडा, भारतनगरवर ड्रोनद्वारे पालिकेची नजर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई)
तीन रुग्णांकडून प्लाझ्मा घेतले, पालिका रुग्णालयांत प्लाझ्मा उपचार सुरुमुंबई महानगरपालिकेने कोरोनातून बरे झालेले तीन रुग्णांकडून प्लाझ्माचे तीन युनिट उपचारांसाठी मिळविले आहे. हा उपचार पात्र ठरलेल्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देण्यात येईल. या रुग्णांचे रक्तगट तपासणी करुन जुळविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा प्लाझ्मा फेरेसिस मशीन नायर रुग्णालयात लावण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना बोलावून प्लाझ्माचे विलगीकरण कऱण्याची प्रक्रिया जलदगतीने करणे शक्य होईल. याकरिता, आणखीन पाच रुग्णांना संपर्क करुन त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांचे प्लाझ्मासुद्धा घेण्याची तयारी सुरु आहे. या उपचार पद्धतीचा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होईल.
राज्यातील बळींचा आकडा ३२३ वर, २२ पैकी १३ रुग्णांना अतिजोखमीचे आजारराज्यात शनिवारी नोंद झालेल्या २२ मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. २२ मृत्यूंपैकी ६० वर्ष किंवा त्यावरील वय असणारे ११ रुग्ण आहेत. तर आठ रुग्ण हे वय ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर तीन रग्ण ४० वर्षांखालील आहेत. २२ पैकी १३ रुग्णांमध्ये ५९ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना (कोविड-१९) मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ३२३ झाली आहे.
(CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, आतापर्यंतचे सर्वाधिक निदान)