coronavirus : धारावीतील कोरोनाबधितांचा आकडा वाढला, आणखी दोन जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:25 PM2020-04-07T20:25:22+5:302020-04-07T20:25:57+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. गेल्या आठवड्याभरात या परिसरातून पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई - गेल्या आठवड्यात धारावी येथील डॉ. बालिगा नगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या ३० वर्षीय महिलेचे वडील आणि भाऊ देखील बाधित असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले असून या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चाचणी केली जात आहे. मात्र धारावी मधील बाधितांची संख्या आता सातवर पोहचल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. गेल्या आठवड्याभरात या परिसरातून पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आणखी काही संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आता दोन लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. डॉ. बालिगा नगरमधील या दोन रुग्णांपैकी एक ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहे. तर दुसऱ्याचे वय ४९ वर्षे आहे.
डॉ. बालिगा नगरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला असून आतापर्यंत चार कोरोना ग्रस्त रुग्ण सापडले आहेत. तर धारावीतील मुकुंद नगर, मदिना नगर येथेही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत सुमारे साडेआठ लाख लोकवस्ती असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या लोकांची चाचणी केली जात आहे.
ही आहेत बाधित क्षेत्रे
डॉ. बालिगा नगर, जास्मिन मिल रोड, धारावी,
वैभव अपार्टमेंट, धारावी मेन रोड
दिनकर अपार्टमेंट दादर पश्चिम
शक्ती चाळ, मुकुंद नगर, धारावी
मदिना नगर, धारावी
चितळे पथ, दादर पश्चिम
एस. के. बोले मार्ग, दादर पश्चिम
सर्वाधिक लोकवस्ती
डॉ. बालिगा नगर
लोकवस्ती अडीच हजार
ज्येष्ठ नागरिक १३२
ताप, आजार, श्वसनाचा त्रास ३२